शिवभोजनच्या थाळ्या वाढविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:36 IST2020-05-25T21:36:25+5:302020-05-25T21:36:45+5:30
लॉकडाउन : पाच रुपयात भोजनाची सोय होत असल्याने गर्दी, अनेक गरजूंना जावे लागते परत

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लॉकडाउनमध्ये शासनाच्या शिवभोजन योजनेचा गरिबांना चांगला आधार मिळाला आहे़ लॉकडाउनच्या काळात शिवभोजन थाळीची किंमत केवळ पाच रुपये केल्याने प्रतिसाद वाढला आहे़ परंतु केंद्र चालकांना थाळ्यांची मर्यादा असल्याने अनेक गरजूंना भोजन मिळत नाही़
धुळे शहरात हिरे वैद्यकीय महाविद्यालय, बस स्थानकातील कॅन्टीन आणि बाजार समितीमधील केंद्रांना १५० थाळ्या वितरीत करण्याची परवानगी आहे तर कमलाबाई कन्या शाळेसमोरील आकाश शिंदे यांच्या केंद्राला केवळ १०० थाळ्या मंजूर करण्यात आल्या आहेत़ बस स्थानकासमोरील संदीप सूर्यवंशी यांच्या खानावळीत प्रशासनाने थाळ्यांची संख्या वाढवून आता २०० केली आहे़
लॉकडाउनमध्ये रोजगार बंद असल्याने शिवभोजन केंद्रांवर गरिब, गरजू आणि निराधार नागरिकांची भोजनाची सोय झाली आहे़ विशेष म्हणजे लॉकडाउनमध्ये शासनाने या थाळ्यांची किंमत दहावरुन फक्त पाच रुपये केल्याने गरजूंना दिलासा मिळाला आहे़ प्रतिसाद वाढल्यामुळे थाळ्या अपुऱ्या पडत आहेत़
कमलाबाई कन्या शाळेजवळील शिवभोजन केंद्र तसेच इंतरही केंद्रांवर थाळ्यांची संख्या केवळ १०० असल्याने अर्ध्या तासातच त्याचे वाटप होवून थाळ्या संपतात़ अनेक गरजूंना भोजनाविना परत जावे लागते़ त्यामुळे थाळ्यांची संख्या वाढवून द्यावी अशी मागणी आकाश शिंदे यांच्यासह इतर केंद्र चालकांनी केली आहे़