राष्ट्रवादी, शिवसेनेचा ‘ईव्हीएम’वर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:04 PM2018-12-11T22:04:42+5:302018-12-11T22:05:05+5:30

महापालिकेवर मोर्चा : भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह, फेरनिवडणूक घेण्याची मागणी

NCP, Shivsena's objection to 'EVM' | राष्ट्रवादी, शिवसेनेचा ‘ईव्हीएम’वर आक्षेप

dhule

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणूकीत अनेक विद्यमान नगरसेवकांचा पराभव करून नवखे उमेदवार जिंकले असून त्यामुळे मतदारच संभ्रमात पडले आहे़ भाजपने ‘ईव्हीएम’मध्ये गडबड केल्याचा आक्षेप घेत राष्ट्रवादी, शिवसेनेतर्फे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला़ तसेच फेरनिवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली़
‘ईव्हीएम’चा जाहीर निषेध
प्रभाग ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सागर कांबळे, बानो बी लतीफ खाटीक, मंदाकिनी पाटील व कैलास चौधरी यांनी एकविरा देवी मंदिरापासून महापालिकेवर मोर्चा काढला़ मनपा निवडणूकीत उमेदवार विजयी झाले नसून ईव्हीएम विजयी झाल्याचा जाहीर निषेध अशा मजकुराचे पोस्टर मोर्चाच्या सुरूवातीस महिलांनी झळकवले होते़ या मोर्चात प्रभाग ४ मधील उमेदवारांसह शिवसेनेचे उमेदवार महेश मिस्तरी, राष्ट्रवादीचे उमेदवार रविंद्र आघाव, जितेंद्र शिरसाठ, संदीप पाटोळे, सुरेश बोरसे यांच्यासह विविध प्रभागातील पराभूत उमेदवार सहभागी झाले होते़ 
फेरनिवडणूकीची मागणी
भाजपचे उमेदवार सक्षम नसतांना शिवाय मतदारांनी देखील त्यांना मतदान केलेले नसतांना भाजप विजयी  झालेच कसे? मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे त्यांना ५० जागा कशा मिळाल्या? असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले़ तर मतमोजणीच्या ठिकाणी वायफाय सेवा बंद ठेवण्याची मागणी केलेली असतांना ती सुरू ठेवण्यात आली व ईव्हीएम हॅक करण्यात आल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला़ त्याचप्रमाणे मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचे नेटवर्क जाणीवपूर्वक जाम करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला़ महेश मिस्तरी यांनी, आपल्याला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ५० जागा भाजपने आधीच मॅनेज केल्याचे सांगितले़ शिवाय २५ लाख दिले तर ‘ईव्हीएम हॅक’ करून आपल्याला विजयी करू, असेही त्याने सांगितले असून आपल्याकडे त्याच्या संभाषणाचे  ‘रेकॉर्ड’ असल्याचे सांगितले़  मतमोजणीच्या दिवशी सकाळीच माझ्या प्रभागात चारही जागा भाजपच्या जिंकणार असल्याचे सांगण्यात आले, एकूणच ‘ईव्हीएम मॅनेज’ असल्याशिवाय असे होऊ शकत नाही, असे मिस्तरी यांनी स्पष्ट केले़ सर्व उमेदवारांनी बॅलेट पेपरव्दारे फेर निवडणूक घेण्याची मागणी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली़ याबाबत राज्य निवडणूक आयोगाला कळविले जाईल, असे आयुक्त म्हणाले़ 
शहरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये ब या जागेवर उमेदवारी करणाºया उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या संख्येत व वैध मतांच्या संख्येत १ हजार मतांची तफावत येत असल्याची तक्रार या प्रभागातील उमेदवार राजश्री किशोर शिंदे यांनी आयुक्तांकडे केली़ वैध मतांमध्ये व उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये १ हजार मतांची तफावत असून निवडणूकीचा निकाल हा पारदर्शक नाही़ तरी याबाबत योग्य तो खुलासा करण्यात यावा, अन्यथा निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे निवेदनात नमुद आहे़ 
भाजपचा नव्हे ‘ईव्हीएम’चा विजय़़़
मनपा निवडणूकीत भाजपचा नव्हे तर ‘ईव्हीएम’चा विजय झाल्याचे शिवसेनेचे महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ जनतेला उमेदवारच माहित नसतांना हजारो मते कशी मिळू शकतात? भाजपने जनतेला केवळ बटन दाबण्याचे पैसे दिले़ कारण कोणतेही बटन दाबले तरी विजय आपलाच होणार, याची खात्री त्यांना होती़ प्रमुख विरोधी पक्ष असल्याने त्यांनी शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न केला़ एमआयएमला बळ देत राष्ट्रवादीला रोखले़  आम्ही व्हीव्हीपॅटच्या मागणीसाठी दाखल  केलेली याचिका अजूनही प्रलंबित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ 

Web Title: NCP, Shivsena's objection to 'EVM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे