नवादेवी धबधबा ठरतोय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST2021-07-28T04:37:31+5:302021-07-28T04:37:31+5:30
बोराडी (ता. शिरपूर): सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेल्या नवादेवी पाडा गावाची वस्ती आहे. या पाड्यापासूनच २०० मीटर ...

नवादेवी धबधबा ठरतोय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र
बोराडी (ता. शिरपूर): सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेल्या नवादेवी पाडा गावाची वस्ती आहे. या पाड्यापासूनच २०० मीटर अंतरावर असलेला नवादेवी धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. सातपुडा डोंगररांगांतून येणाऱ्या पाण्याच्या
सरींमुळे विविध ठिकाणी धबधबासदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या धबधब्याकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. तालुक्याच्या पर्यटनात नवादेवी, धाबादेवी हे धबधबे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. वन पर्यटनाने समृद्ध हे ठिकाण असल्याने येथे गर्दी होत आहे. बोराडीपासून १० किलोमीटर अंतरावर (ता. शिरपूर) कोडीद येथील नवादेवी धबधबा हा पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय म्हणून उपलब्ध आहे. धुळे आणि जळगाव, नंदुरबार परिसरातील पर्यटक सध्या एकदिवसीय पर्यटनासाठी ‘नवादेवी’ धबधब्याला मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
नवादेवी परिसर हा पावसाळ्यात नेहमीच पर्यटकांसाठी सुखावह पर्यटनाचा आनंद देणारा परिसर आहे. गेले काही दिवस मनसोक्त बरसणाऱ्या पावसामुळे सातपुडा परिसर हिरवाईने नटलेला आहे. नवादेवी धबधब्याखाली भिजण्याचा पर्यटक मनसोक्त आनंद लुटत आहेत.
‘नवादेवी’ धबधबा सध्या येथे सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण दिसत आहे. शनिवार आणि रविवारी या सुटीच्या दिवशी मोठी गर्दी होताना दिसत आहे. पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांचे पाय आपोआप नवादेवी धबधब्याकडे वळतात. या धबधब्यापर्यंत सुरक्षित जायला आणि निसर्गरम्य पर्यटनाची माहिती द्यायला स्थानिक नागरिकांची मदत मिळत आहे. शासनाने या निसर्गरम्य पर्यटन स्थळाचा विकास केला तर नक्कीच या भागातील आदिवासी कुटुंबांना रोजगार मिळेल. या निसर्गरम्य पर्यटन स्थळाचा विकास करण्याची गरज आहे.