माझी वसुंधरा अभियानात निसर्ग प्रेमींनी सहभाग नोंदवावा - जि.प.अध्यक्ष डॉ. तुषार रंधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:37 IST2021-09-11T04:37:13+5:302021-09-11T04:37:13+5:30
जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान टप्पा 2 सर्व तालुक्यात प्रभावीपणे जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामपातळीवर राबविण्यात येत आहे.याबाबत बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष ...

माझी वसुंधरा अभियानात निसर्ग प्रेमींनी सहभाग नोंदवावा - जि.प.अध्यक्ष डॉ. तुषार रंधे
जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान टप्पा 2 सर्व तालुक्यात प्रभावीपणे जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामपातळीवर राबविण्यात येत आहे.याबाबत बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे म्हणाले की, हे अभियान न राहता लोकाभिमुख चळवळ उभी राहायला पाहिजे, यासाठी समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, विशेषतः निसर्गप्रेमी संघटना, निसर्गप्रेमी व्यक्ती, तरुण युवक युवती, अध्यात्मिक संप्रदाय, डॉक्टर, वकिल यांनी सहभागी व्हावे, वसुंधरा संवर्धन ही आजची निकड आहे, असमतोल नैसर्गिक वातावरण हा निसर्ग कोपाचा एक भाग आहे,
शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनीही सहभागी होऊन सुटीच्या दिवशी श्रमदान करून वृक्षारोपण व संवर्धन करावे,स्वतःचा किंवा घरातील सदस्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी किमान एक तरी वृक्षारोपण करावे झाड जोपासावे, लोकप्रतिनिधी शासकीय यंत्रणेतील सर्वांनी प्लस्टिक मुक्ती स्वतःपासून सुरुवात करून समाजात वक्ता स्पर्धा, निबंध स्पर्धा माध्यमातून वसुंधरा संवर्धनासाठी नदी स्वच्छता, प्लस्टिक शाप की वरदान अशा अनेक निसर्गोपयोगी विषयांवर प्रचार व प्रसिध्दी द्यावी,
माझी वसुंधरा अभियान टप्पा 2 मध्ये राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र, तरुण मित्र मंडळ, गणेश मंडळातील युवाशक्तीने, वारकरी संप्रदाय, महिला मंडळ, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवक, सर्व शिक्षक संघटना, ग्रामसेवक संघटना या सर्वांनी गावपातळीवर संयुक्तिक संकल्पना प्रभावी पणे राबवून अभियान निश्चित यशस्वी होईल याची खात्री आहे.
मौजे करवंद येथे सात हजारापेक्षा जास्त वृक्षारोपण यशस्वी कार्यक्रमाची मी स्वतः भेट देऊन पाहणी केली असता करवंद ग्रामपंचायत सरपंच सौ मनिषाताई पाटिल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री देवेंद्र पाटिल यांच्या अथक परिश्रमाने फुललेले निसर्गरम्य वातावरण अनुभवले आहे. या मंडळींचे मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देत असा उपक्रम सर्वांनीच स्वतः प्रेरित होऊन यशस्वी करणे यालाच वसुंधरा देवीची, निसर्गाची आराधना म्हणणे संयुक्तिक ठरेल, या वसुंधरेची जेवढी सेवा करु त्याच्या हजार पटीने परतफेड निसर्ग, ब्रम्हांड करत असते याची जाणीव डॉ. रंधे यांनी करून दिली.
या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुसुमताई निकम, सर्व सभापती सर्व जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी व खाते प्रमुख उपस्थितीत होते.