काय आहे आचारसंहिता
कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयातील दूरध्वनीचा वापर करावा़ कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामांसाठी आवश्यक तेव्हाच मोबाईलचा वापर करावा़ मोबाईलवर सौम्य आवाजात बोलावे़ वाद घालू नये़ कार्यालयीन कामांसाठी मोबाईलचा वापर करताना टेक्स्ट मॅसेजचा वापर करावा़ मोबाईलवर आलेले अत्यावश्यक वैयक्तिक कॉल बाहेर जाऊन घ्यावेत़
जिल्हाधिकारी कार्यालय
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन होताना दिसून येत आहे़ अनेक कर्मचारी कामकाजाच्या वेळेत बाहेर जाऊन मोबाईलवर बोलताना दिसून आले़ तर, काही कर्मचारी आपल्या टेबलावर बसूनच बोलत होते़
महापालिका
महापालिकेच्या आवारातसुद्धा अशीच काहीशी परिस्थिती अनुभवाला आली़ एक विभाग इकडे तर दुसरा विभाग तिकडे, अशी स्थिती आहे़ सर्रासपणे काही जण बाहेर येऊन तर काही जणांचा मोबाईल काम करीत असताना सुरू होता़ काही तर ब्लूटूथच्या आधारे संभाषण करीत होते़
सरकारी कार्यालय, नको रे बाबा
जिल्हाधिकारी कार्यालयात जमिनीच्या कामासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून सारखा ये-जा करीत आहे़ कोणीही व्यवस्थित उत्तर देत नाही़ माझी नेमकी समस्या काय आहे हे कोणीही समजून घेत नाही़ वरिष्ठांकडे तक्रार केल्यास होणारे काम पुढे मार्गी लागेल की नाही, ही मनात भीती असल्यामुळे तक्रारही करू शकत नाही़
- देविदास माळी
शिधापत्रिकेसह अन्य किरकोळ कामांसाठी शासकीय कार्यालयात यावे लागते़ तांत्रिक अडचणीचे ठोकळेबाज उत्तर देऊन कर्मचारी मोकळे होतात़ काम होत असेल तर कागदपत्रांची अपूर्णत: सांगून मोकळे होतात़ सर्व कागदपत्र आणलेच तर एखादा कागद नसल्याचे कारण सांगून परत पाठविले जाते़ वारंवार येऊनही काम वेळेवर मार्गी लागत नाही़
- पुंडलिक पाटील
कार्यालय प्रमुख म्हणतात...
- कार्यालयात मोबाईलच्या वापरासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे़ यामुळे नागरिकांची कामे वेळेत होतील़ शासनाच्या नियमांचे कुणी उल्लंघन करताना आढळून आल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल़
जलज शर्मा, जिल्हाधिकारी
- शहरी भागातील विविध भागांतून नागरिक आपल्या कामांसाठी येत असतात़ त्यांची कामे वेळीच झाली पाहिजेत, अशी माफक अपेक्षा आहे़ काही तांत्रिक अडचण असल्यास वरिष्ठांशी संपर्क साधून त्यांची होणारी कामे मार्गी लावावीत़ मोबाईलवर बोलून आपल्या नियमित कामांकडे दुर्लक्ष करू नये़ असे आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल़
अजीज शेख, आयुक्त, महापालिका़