सौंदर्याने नटलेल्या सातपुड्यातील नागेश्वर मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 13:13 IST2020-02-23T13:12:40+5:302020-02-23T13:13:08+5:30
रौप्य महोत्सवाचे आचित्य साधून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : चोपडा मार्गावरील अजनाड बंगला फाट्यापासून २ किमी अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी श्रीक्षेत्र नागेश्वर मंदिर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या हातून झालेले एक शिवकार्य़ हे शिवालय म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश येथीलही भाविकांचे श्रध्दास्थान आहे़ या परिसराचा कायापालट करतांना संस्थानचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या कल्पक व कुशाग्रबुध्दीने नैसर्गिक ठेवणीला कुठेही इजा न पोहचता, मंदिराचे पुरातनत्व कायम ठेवत गेल्या २५ वर्षात अत्यावश्यक खर्च करून हे नागेश्वर शिवालय व परिसराला वेगळी ओळख प्राप्त करून दिली आहे़ त्या विकासरूपी पुष्पमालेतीलच एक पुष्प म्हणजे गोमुख परिसरात आताच नव्याने बांधलेले श्री गणपती, पार्वतीमाता, श्री शंभू महादेवांचे मंदिर, गुरूदत्त, ऋषि महाराज, हनुमंत व मोतीमाता मंदिरे उभारली आहेत़
१९९५ साली स्थापन झालेल्या संस्थानचे २०२० वर्ष रौप्य महोत्सवाचे आहे़ या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधून प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे़ प़पू़आनंद चैतन्य महाराजांचा त्रिदानात्मक सत्संग रात्रीच्या वेळी आहे़ प़पू़सखाराम महाराज अमळनेरकर यांचे शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण होईल़ या सोहळ्याला आनंदी, नाशिक, उज्जैन येथील विद्वान वैदीकांकडून महारूद्र स्वाहाकार आयोजित करण्यात आला आहे़ तालुक्याचे श्रध्दाळू व भाविक नेते भूपेशभाई पटेल यांचे प्रमुख नियोजनातून हा सोहळा होत आहे़ मंदिराची देखभाल आज स्वतंत्र नागेश्वर सेवा ट्रस्टच्यावतीने होत असली तरी कधी काळी हे मंदिर अनाथ होते़ श्री नागेश्वराचा परिसर दाट झाडांनी, वेली-वनस्पतींनी हिरवागार होता़ १० फुटजवळचे सहज दिसणे सुध्दा शक्य नव्हते़ त्याकाळात काही नागे साधू येथे वस्तीला होते़ या परिसरात असेच एक पेलाद महाराज म्हणून होवून गेले़ ते देखील विविध चमत्काराचे किस्से सांगत असत़ शिरपूर पॅटर्नची पाणी योजना जशी देशात नावारूपाला आहे तसे या तालुक्यात बालाजी मंदिर व नागेश्वर मंदिर या तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावलेल्या मंदिरांचा समावेश करता येईल़ माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी खासदार स्वर्गीय मुकेशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्यामुळे मंदिरांचा जिर्णोद्वार होत आहे़ गोमुख मंदिरावर जाण्यासाठी असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्याबाजूस पुरातन गोमुख आहे़ गोमुखातून अनेक वर्षापासून अखंडपणे गोडपाण्याचा झरा वाहत आहे़ या गोमुखातून उन्हाळ्यात गार पाणी व हिवाळ्यात कोमटपाणी निघते़ दृष्काळातही या गोमुखातून वाहणारा हा झरा आटत नाही़ पाझरतलाव मंदिराच्या परिसरात असून १९७२ च्या दृष्काळात या पाझर तलावाचे काम केले आहे़ सालाबादाप्रमाणे श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी लाखोच्या संख्येने भक्तीभावाने भाविक दर्शन व नवस फेडण्यासाठी येत असतात़, अशी माहिती शिरपूरचे सुभाष कुलकर्णी यांनी दिली.