माझे पप्पा ड्युटीवर आहे, तुम्ही घरी थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:50 IST2020-04-06T21:49:44+5:302020-04-06T21:50:05+5:30
भावनिक साद : नोडल अधिकाऱ्यांच्या मुलीच्या मनातील भावना़

माझे पप्पा ड्युटीवर आहे, तुम्ही घरी थांबा
धुळे : ‘माझे पप्पा ड्युटीवर आहेत, कृपया त्यांच्यासाठी तरी तुम्ही घरातच थांबा’ असे भावनिक आवाहन जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांची नऊ वर्षीय मुलगी रिदीमा हिने केले आहे.
सध्या कोरोनाचे थैमान सर्वत्र सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वैद्यकीय कर्मचारी कोरोनाशी दोन हात करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर माझे पप्पा रुग्णांवर उपचार करीत आहेत. तुम्ही घराबाहेर पडू नका असे भावनिक आवाहन रिदीमा पाटील हिने नागरिकांना केले आहे. पप्पा जेव्हा रोज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ड्युटीला जातो तेव्हा मला छान वाटते की तो कोण्या रुग्णाला बरे करायला जातोय़ पण, थोडी भीती पण वाटते. बाहेर असतांना त्याला तर काही होणार नाही ना.. तो दिवसभर कोरोनाच्या कामात व्यस्त असतो. पप्पा, आधी आम्हाला फोन करायचा, बोलायचा़ मात्र आता त्याला आमच्याशी बोलायलाही वेळ नसतो. अशी तक्रारही चिमुकली रिदीमा करते. तसेच पप्पा कोरोनाच्या कामानिमित्ताने घराबाहेर तरी पडतोय़ गेल्या २० दिवासांपासून ती घराबाहेरच गेली नसल्याचे सांगते. याक्षणाला घराबाहेर न जाणेच योग्य आहे. नागरिकांनाही घराबाहेर पडू नका असे आवाहन ती करते.
पप्पा आमच्यासोबत
खेळत सुध्दा नाही
पप्पा घरी आल्यानंतर आमच्यासोबत खेळत नाही. आधी तो माझी लहान बहीण तनू व माझ्यासोबत खेळायचा़ आम्हाला गोष्ट सांगायचा़ आता मात्र तो आम्हाला हात देखील लावत नाही. तो सतत बाहेर फिरत असल्यामुळे घरी आल्यानंतर आमच्यापासून लांब राहतो, असे लहानगी रिदीमा सांगते.
आतातरी नागरीकांनी घरीच थांबावे असेही भावनिक आवाहन तिने पुन्हा केले आहे़
जिल्हा रुग्णालयात ८० जणं कार्यरत
आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात १००० रूग्णांची स्क्रीनींग केली आहे़ त्यापैकी ५७ रुग्णांना पुढील तपासणीसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले होते. जिल्हा रुग्णालयात २० डॉक्टर, ४० परिचारीका, २० इतर कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. कोरोनावर विजय मिळविण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकांनी घरातच थांबून आम्हाला सहकार्य करावे, असे जिल्हा रुग्णालयातील कोरोना नोडल अधिकारी डॉ़ विशाल पाटील यांनी आवाहन केले आहे़