दारूच्या पैशाच्या उधारीवरून तरुणाचा खून; शिरपूर येथील घटना; चार जणांवर खुनाचा गुन्हा

By देवेंद्र पाठक | Updated: April 24, 2023 21:19 IST2023-04-24T21:18:46+5:302023-04-24T21:19:03+5:30

शिरपूर : दारूच्या पैशाच्या उधारीवरून तरुणाला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना ...

Murder of youth over loan of liquor money; incident at Shirpur; Murder case against four persons | दारूच्या पैशाच्या उधारीवरून तरुणाचा खून; शिरपूर येथील घटना; चार जणांवर खुनाचा गुन्हा

दारूच्या पैशाच्या उधारीवरून तरुणाचा खून; शिरपूर येथील घटना; चार जणांवर खुनाचा गुन्हा

शिरपूर : दारूच्या पैशाच्या उधारीवरून तरुणाला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना शिरपूर येथील सुंदरवाडी रोडवर रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. त्याला रुग्णालयात दाखल केले असता रात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसांत सोमवारी (दि. २४) दुपारी खुनाचा गुन्हा दाखल झाला. संशयित चौघे फरार झाले आहेत. राजू सुदाम कोळी (वय ३२, रा. वाल्मीकनगर, शिरपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

मृत तरुणाचा भाऊ राकेश सुदाम कोळी (वय २३, रा. वाल्मीकनगर, शिरपूर) याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, त्याचा भाऊ याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे ताे किस्मतनगर येथे दारू पिण्यासाठी जात होता. दारूच्या उधारीच्या पैशांमुळे तीन दिवसांपूर्वी त्याचे भांडण झाले होते. शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली नव्हती. त्यानंतर पुन्हा रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास राजू हा दारू पिण्यासाठी किस्मतनगर येथे गेला असता सुंदरवाडी रोडवर चार जणांनी अडविले. शिवीगाळ करीत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला, पाठीला, पोटाला आणि तोंडावर गंभीर दुखापत झाली.

मारहाण होत असल्याचे लक्षात येताच त्याला त्याच्या भावांनी सोडविले. राजू याला गंभीर अवस्थेत घरी आणण्यात आले. त्याच्या कानातून रक्तश्राव होत होता. डोळाही सुजला होता. त्याला घरातच झाेपविण्यात आले. सायंकाळी तो झोपेतून उठत नसल्याने त्याला कॉटेज हॉस्पिटल शिरपूर येथे दाखल करण्यात आले. डॉ. दिव्या तवर यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सोमवारी दुपारी ४ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित फरार झाले आहेत.

Web Title: Murder of youth over loan of liquor money; incident at Shirpur; Murder case against four persons