‘मुन्नाभाई एमबीबीएस’ शोधमोहिमेचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:11 IST2019-11-24T22:10:46+5:302019-11-24T22:11:08+5:30
शिरपूर : तालुक्यात बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई होऊनही पुन्हा थाटतात व्यवसाय

Dhule
शिरपूर : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे़ विशेषत: आदिवासी दुर्गम भागातील गाव-पाड्यांवर तर पश्चिम बंगालमधील बोगस पदवीप्राप्त केलेल्या डॉक्टरांसह त्यांच्यासोबत कंपाउंडर म्हणून काम करणारे सुध्दा या परिसरात ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ म्हणून परिचित आहेत़ अनेकदा कारवाई सुध्दा झाल्या. मात्र, पुन्हा ‘जैसे थे’ हा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असून रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़
शहरासह तालुक्यात मुन्नाभाई एमबीबीएस म्हणजे बोगस डॉक्टर शोध मोहिम करून नावाला कारवाई केली जाते़ राज्यात बोगस डॉक्टरांचे पेव फुटले आहे़ असे असतांना देखील वरिष्ठ पथकाकडून ठोस अशी कारवाई होतांना दिसत नाही़
तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार व आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात गतवर्षी आॅगस्ट महिन्यात बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे बोगस डॉक्टरांचे धाबे धणाणले होते. जिल्ह्यासह शिरपूर तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई झाली़ ते पोलिस कोठडीची हवा देखील खाऊन आले, न्यायालयातून जामिन मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसानंतर त्यांनी पूर्ववत हा व्यवसाय कारवाई झाली त्याच घरात थाटला़ त्यांनी कोणतीही भीती न बाळगता पुन्हा आपला व्यवसाय सुरु केल्यामुळे यांना कुणाचा आशीर्वाद तर नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. तीन डॉक्टरांवर कारवाई झाल्यानंतर अन्य बोगस डॉक्टरांवर त्यानंतर काहीच कारवाई झाली नाही़
आदिवासी बहुल या तालुक्यात तर सर्रास हा प्रकार पाहायला मिळतो़ कारण खेडोपाडी ठाण मांडून या बोगस डॉक्टरांचा स्थानिक अडाणी राजकारण्यांच्या आशीर्वादाने त्यांचे आदिवासी ग्रामस्थांवर सर्रास हानिकारक उपचार सुरु आहेत. ते लोकांच्या अस्तित्वाला धोकादायक आहे. हे बोगस डॉक्टर्स दहावी अथवा बारावी सुद्धा उत्तीर्ण नसल्यामुळे त्यांना कोणत्याही उपचाराचा अभ्यास नसतो तरी सुद्धा हे कोणाच्या आशीर्वादाने खेडोपाडी पसरलेले आहे, हा संशोधनाचा विषय आहे. हे बोगस डॉक्टर्स अनेक वर्षांपासून स्थायिक झाले आहेत तर काही खेडोपाडी फिरणारे आहेत.
गतवर्षी कोडिद, मालकातर, पनाखेड, सांगवी, हाडाखेड, बोराडी, आंबे या ठिकाणी बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई झाली़ त्यांना पोलीस कोठडीही झाली. परंतू जामिन मंजूर करून पुन्हा त्यांनी व्यवसाय ‘जैसे थे’ सुरु केले़ या बोगस डॉक्टरांनी कोणतीही भीती न बाळगता बिनधास्तपणे हा व्यवसाय थाटला आहे़ पथकाकडून खाजगी दवाखान्यांची तपासणी होणार हे कळताच ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ डॉक्टर दवाखान्यांना कुलूप लावून काही दिवस गायब राहतात़ आणि नंतर पुन्हा येतात.
तालुक्यात २२ ते २५ संशयित
तालुक्यात २२ ते २५ संशयित बोगस डॉक्टरांची यादी आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे़ शहराची यादी उपजिल्हा रूग्णालय अथवा नगरपालिका प्रशासनाकडे असल्याचे सांगण्यात आले़ विशेषत: शहरातही असे बोगस डॉक्टर आहे़ संबंधित विभागाकडे अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी फौजफाटा नाही, अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी वेळ नाही, दुर्दैवाने धाड टाकण्यापूर्वीच असे डॉक्टर तेथून फरार होतात़ त्यानंतर पुन्हा अधिकारी धाड टाकण्यासाठी येत नसल्यामुळेच अशा बोगस डॉक्टरांचा व्यवसाय फोफावत आहे़