आमदार जयकुमार रावल यांनी कोरोना वाढू नये म्हणून विभागवार नियोजनाचा, तयारीचा, उपाययोजनांचा आढावा घेतला. मागील काळात आतापावेतो पाच हजार ७२२ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून, ३०२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सद्यपरिस्थितीत एक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. १०२७ जणांना कोरोना लसीकरण झाले आहे. यावेळी आमदार जयकुमार रावल यांनी रुग्ण वाढल्यास काय तयारी आहे, याबाबत विचारणा केली. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन सिस्टीम तात्काळ अपडेट, दुरुस्त करण्याची सूचना दिली. उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यात कोरोना पार्श्वभूमीवर समन्वय असणे गरजेचे आहे. रेमीडिअर इंजेक्शनसह औषधी साठा तयार ठेवा, दोंडाईचाला प्राधान्यक्रम देऊन कोरोना लसीकरण करा. रोटरी, रोटरी सिनिअर, लायन्स, जायंट्स यांच्यासह अन्य सोशल क्लब, जैन सोशल ग्रुप, व्यापारी असोसिएशन यांनी कोरोना उपाययोजनांबाबत जनजागृती करावी. मास्क लावणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधकारक करावे, लग्नकार्य-अंत्यविधी यात गर्दीला नियंत्रण करा, दोंडाईचा शहरात विविध १२ ठिकाणी मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स न ठेवणे आदीवर संयुक्तपणे कारवाई करा. अत्याधुनिक कार्डिओ रुग्णवाहिका तात्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्यात.
उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता बघता नगरपालिकेमार्फत आठ आठवडे स्वच्छता होणार असल्याचे सांगितले. परंतु नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोना वाढला तर नाइलाजास्तव जनहीत बघता रविवारी बंद ठेवावा लागेल व पुन्हा जास्तीचा उद्रेक झाला, तर सर्वानुमते गुरुवार बंद ठेवावा लागेल. जिल्हा शल्य चिकित्सक सांगळे बैठकीला अनुपस्थित असल्याने आमदार जयकुमार रावल यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, सर्वच विभाग काय उपाययोजना व कार्यवाही करणार आहेत, याची माहिती विभागनिहाय मांडण्यात आली.