मोकळ्या भूखंडावर मालकी हक्क दाखविणारा महापालिकेचा फलकच तोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST2021-04-30T04:45:26+5:302021-04-30T04:45:26+5:30
धुळे : एकीकडे महापालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन आटापिटा करीत असताना दुसरीकडे मात्र हे भूखंड गिळंकृत करणाऱ्यांची ...

मोकळ्या भूखंडावर मालकी हक्क दाखविणारा महापालिकेचा फलकच तोडला
धुळे : एकीकडे महापालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन आटापिटा करीत असताना दुसरीकडे मात्र हे भूखंड गिळंकृत करणाऱ्यांची दादागिरी वाढत चालल्याचे चित्र आहे. शहरातील फाशीपूल चाैकातील मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिकेने लावलेला मालकी हक्क दर्शविणारा फलकच अज्ञात व्यक्तींनी तोडल्याची घटना घडली असून, याबाबत पालिका प्रशासनाकडे रीतसर तक्रारदेखील करण्यात आली आहे. धुळे शहरात फाशीपूल भागातल्या लेनिन चाैकात सिटी सर्व्हे क्रमांक १४८१ हा महानगरपालिकेच्या मालकीचा मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याने गेल्या वर्षी विवेक जाधव, योगेश मुकुंदे, विनोद साळुंके, संजय कांबळे, मनोहर पवार, धीरज शेलार, गाैतम जाधव, संजय इथापे, सुनील माने, स्वप्निल कोळी यांच्यासह लेनिन चाैकातील नागरिकांनी गेल्या वर्षी महानगरपालिकेला वेळोवेळी पत्रव्यवहार करून या बखळ जागेवर मालकी हक्क दर्शविणारा फलक लावण्याची मागणी केली होती. त्यावेळी महानगरपालिका प्रशासनाने या जागेत फलक लावला. ही जागा महापालिकेच्या मालकीची असून कुणी अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा आदेश आयुक्तांच्या सहीने त्या फलकावर दिला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुणीतरी अज्ञात इसमाने या फलकाची तोडफोड करून फलक पूर्णपणे वाकविला आहे. याबाबत विवेक जाधव यांनी बुधवारी महानगरपालिकेला तक्रार अर्ज दिला आहे. फलक पुन्हा लावण्याची मागणी त्यांनी अर्जात केली आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले म्हणून फाैजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.