मुक्या जिवांना मिळाला पुलाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 13:09 IST2020-07-06T13:07:37+5:302020-07-06T13:09:01+5:30
संधीचे सोने : सुरत-नागपूर महामार्गाचे काम रखडल्याने झाली गुरांची सोय

मुक्या जिवांना मिळाला पुलाचा आधार
धुळे : येथील चितोड गावाजवळ असलेला उड्डाणपुल पावसाळ्यात मुक्या जिवांसाठी आधार ठरत आहे़ सुरत-नागपूर महामार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले असून गावातील एका गुराख्याने संधीचे सोने करीत प्रगतीत असलेल्या या पुलाचा गुरांचा गोठा म्हणून वापर करण्यास सुरूवात केली आहे़
दरवर्षी पावसाळ्याच्या आधी गुरांच्या गोठ्याची आणि छताची दुरूस्ती करण्याचे काम ग्रामीण भागात प्राधान्याने हाती घेतले जाते़ पावसाच्या पाण्याचा मारा आणि विजांपासून संरक्षण व्हावे यासाठी बऱ्याचदा नव्याने गोठा बांधला जातो़ असे असले तरी गुरांचा गोठा हा झोपडीप्रमाणे छपºयाचा असतो़ त्यामुळे पावसाच्या पाण्यापासून गुरांचे फारसे संरक्षण होत नाही़ गोठ्यात पाणी शिरते आणि चिखल होतो़
यंदाच्या पावसाळ्यात मात्र चितोड गावातील गुरांचे नशिब उजळल्याचे दिसत आहे़ कारण या गुरांना पारंपारिक गोठा नव्हे तर आरसीसी बांधकाम असलेला प्रशस्त असा हवेशीर आयता गोठा मिळाला आहे़ सुरत-नागपूर महामार्गावर काम बंद पडलेल्या उड्डाणपूलाच्या खाली गुराख्याने आपल्या गुरांची चांगली सोय केली आहे़ उड्डाणपूलाचे काम उंचावर असल्याने आत पाणी शिरण्याची शक्यता नाही़ या गोठ्यात गुरांचे उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण झाले़ आता पावसाळ्याचीही सोय झाली़ विशेष म्हणजे या गोठ्यात एका गायीने वासरुला जन्म दिल्याने या गोठ्याला घरपण आले आहे़