सलून व्यावसायिकांचे धुळ्यात पुन्हा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 20:43 IST2020-06-14T20:43:17+5:302020-06-14T20:43:37+5:30
नाभिक टायगर सेना : व्यवसायाला परवानगी द्या

dhule
धुळे : महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन शिथील केल्याची घोषणा केल्यानंतर गेल्या पाच तारखेपासून दुकाने सुरू करण्यास धुळे जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे़ परंतु त्यातून सलून व्यवसायाला वगळण्यात आले आहे़ त्यामुळे नाभिक समाजाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलन केले जात आहे़
गेल्या आठवड्यात सलून व्यावसायिकांनी प्रतिकात्मक स्वरुपात दुकान सुरू करुन अनोखे आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते़ शुक्रवारी पुन्हा नाभिक टायगर सेनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन निदर्शन करण्यात आली़
महाराष्ट्र राज्य नाभिक टायगर सेनेचे धुळे शहराध्यक्ष योगेश प्रकाश ठाकरे, भगवान चित्ते, नाना वारूडे, दिनेश महाले, भास्कर ठाकरे, नंदू बोरसे, भटू बोरसे, विशाल बोरसे, निखील ठाकरे, गिरीश महाले, गोपाल वारूडे, सागर चित्ते आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमध्ये सलून व्यावसायिकांनी २१ मार्चूपासून दुकाने बंद ठेवून शासन, प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य केले आहे़ परंतु इतर दुकानांना परवानगी दिल्यानंतर सलून व्यवसाय मात्र बंद ठेवण्यात आला़ त्यामुळे सलून व्यावसायिकांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी तसेच आर्थिक मदत व संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे़