ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी तेली, माळी, सुवर्णकार समाजाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST2021-07-04T04:24:42+5:302021-07-04T04:24:42+5:30
धुळे : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी तैलिक महासंघाच्या नेतृत्वाखाली तेली, माळी तसेच सुवर्णकार समाजातर्फे शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी ...

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी तेली, माळी, सुवर्णकार समाजाचे आंदोलन
धुळे : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी तैलिक महासंघाच्या नेतृत्वाखाली तेली, माळी तसेच सुवर्णकार समाजातर्फे शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.
शहरातील क्युमाईन क्लब रस्त्यावर धरणे आंदोलन आणि लाक्षणिक उपोषण झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या. शासनाने न्यायालयात वेळेवर माहिती सादर न केल्याने राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने काेर्टात जोपर्यंत इम्पिरियल डाटा सादर करत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिकेत आता ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळणार नाही. हा ओबीसी समाजावर अन्याय आहे. ओबीसींचे आरक्षण कायम राहावे, यासाठी शासनाने न्यायालयात तत्काळ डाटा सादर करावा, अन्यथा पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत रद्द केलेले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक इम्पिरियल डाटा सुप्रीम काेर्टात सादर करावा, ओबीसी आरक्षणाला स्थगिती देणारा आदेश रद्द करावा, केंद्र व राज्य सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा कायदा संमत करावा, मंडल आयाेग लागू करावा, न्यायालयाला अपेक्षित असलेली माहिती तीन महिन्यांत सादर करावी, न्यायालयाचा आरक्षण नाकारण्याचा आदेश रद्द करण्यासाठी पाठपुरावा करावा, पाेटनिवडणुकीबाबतची अधिसूचना रद्द करून निवडणुका रद्द कराव्यात, राज्य व केंद्र सरकारने मंडल आयाेगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात,
केंद्र, राज्य शासनाने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, लाेकसंख्येच्या प्रमाणात टक्केवारीनुसार प्रत्येक क्षेत्रात आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनात तैलिक युवा महासंघाचे प्रदेश महासचिव नरेंद्र चाैधरी, तेली पंचायतीचे अध्यक्ष भगवान करनकाळ, जिल्हाध्यक्ष कैलास चाैधरी, शहराध्यक्ष रमेश करनकाळ, शशिकांत चाैधरी, सुभाष जाधव, बी. डी. महाले, अनिल अहिरराव, गणेश चाैधरी, उमेश चाैधरी, शिरीष चाैधरी, रवींद्र चाैधरी, तुषार चाैधरी आदी सहभागी झाले हाेते.