लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गेल्या वर्षभरामध्ये सततचा पाऊस, अतिवृष्टी, वादळ, गारपिटीमुळे तब्बल ४४ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यापैकी २१ हजार ८०० शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे तर २२ हजारांपेक्षा अधिक शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसानभरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांनादेखील केवळ मदतीचा पहिला हप्ता मिळाला आहे. दुसरा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे. कोरोनामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचे सांगण्यात आले.
एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत वादळी वारा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट व सततचा पाऊस यामुळे धुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु, ३३ टक्केवरील समाविष्ट गावांची संख्या केवळ ५०१ आहे.
१४ मे २०२० रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे १५ शेतकरी बाधित झाले होते. विशेष म्हणजे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ३ जून २०२० रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारी निरंक आहे. २४ जुलै २०२० रोजी झालेल्या पावसामुळे ९६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सर्वाधिक २० हजार २८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यात धुळे तालुक्यात एकाही शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही. साक्री तालुक्यात ७ हजार ३२४, शिरपूर तालुक्यात ४ हजार ५०५, शिंदखेडा तालुक्यात ८ हजार ४५४ शेतकरी बाधित झाले आहेत.
तसेच ४ व ५ सप्टेंबर, १३ सप्टेंबर, १९ ते २४ सप्टेंबर या कालावधीत झालेले वादळी वारे, अतिवृष्टी, गारपीट व सततचा पाऊस यामुळे धुळे तालुक्यात ६९०, साक्री तालुक्यात १९ हजार ४६०, शिंदखेडात १ हजार ३५६ आणि शिरपूर तालुक्यातील ७१५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
दिनांक १४ ते २० ऑक्टोबर दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे शिरपूर तालुक्यात ४२४ फलोत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दिनांक ११ ते १४ डिसेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शिंदखेडा तालुक्यात ९११ आणि शिरपूर तालुक्यात २९ अशा एकूण ९४० शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
दरम्यान, सन २०२१मध्येही जिल्ह्यात दोन ते तीनवेळा अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळाचा अनेक गावांना फटका बसला आहे. प्रशासनाने पंचनामा केला आहे. परंतु, शासन, प्रशासन कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा मागे पडला आहे.
दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.