मायलेकाची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 22:49 IST2020-06-03T22:49:00+5:302020-06-03T22:49:32+5:30
दिलासादायक : आतापर्यंत ९२ रुग्ण झाले कोरोनामुक्त

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील गल्ली क्रमांक चार येथील रहिवासी असलेल्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याने व २८ वर्षीय आईने कोरोनावर मात केली आहे.
कोरोनामुक्त झालेल्या मायलेकांवर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर बुधवारी त्यांना हिरे महाविद्यालयातून टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला़
यावेळी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधिक्षक राजकुमार सुर्यवंशी, समन्वयक डॉ. दिपक शेजवळ, डॉ. निर्मलकुमार रवंदळे यांच्यासह इतर डॉक्टर, नर्स, ब्रदर्स आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते़
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ त्यात हिरे वैद्यकीय महाविद्यायातील वैद्यकीय टीमने ८४ रुग्णांना बरे करुन घरी सोडले आहे तर शहरातील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि ब्रदर्सच्या पथकाने कोरोना झालेल्या आठ रुग्णांना बरे केले आहे़
धुळे जिल्ह्यासाठी बुधवार एक प्रकारे कोरोनामुक्त दिवस ठरला़ दिवसभरात एकही रुग्ण पॉझीटीव्ह आढळला नसल्याने दिलासा मिळाला़
दरम्यान, बुधवारी एकूण ३३ रुग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यातील आठ संशयित रुग्णांचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ इतरांना लक्षणे नसल्याने घरी पाठविण्यात आले आहे़ क्वारंटाईन कक्षात दोन संशयित रुग्ण दाखल आहेत़ ३३ रुग्णांच्या तपासणी अहवालाची प्रतिक्षा आहे़
बुधवारी मायलेकाला सुटी देताना टाळ्यांचा गजर झाला त्यावेळी वातावरण भावुक झाले होते़ मायलेकाने कोरोना योध्द्यांच्या रुग्णसेवेचे कौतुक केले़
४धुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आरोग्य विभागाने जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करण्याचे काम सुरू ठेवले आहे़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय तसेच शहरातील जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू असून दोन्ही रुग्णालयाच्या कोरोना कक्षात दाखल ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ येथील डॉक्टर, नर्स, ब्रदर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी अखंडपणे सुरू ठेवलेल्या रुग्णसेवेचे कौतुक होत आहे़ धुळे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल़