स्थलांतरीत विद्यार्थ्यांना शोधून काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:27 IST2019-12-01T12:26:51+5:302019-12-01T12:27:08+5:30
शिरपूर । चारणपाडा शाळेतील शिक्षकाने आणले विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात

Dhule
शिरपूर : सालाबादाप्रमाणे जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थी आई-वडिलांसोबत पोटापाण्याचा प्रश्न म्हणून स्थलांतराच्या खडतर प्रवासाला निघून गेली. येथील शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चर्चा करून आढावा घेतला़ आणि आपले विद्यार्थी जेथे असतील तेथे त्यांना त्यांच्या जवळच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून काम करायचे ठरविले. त्याकरीता चारणपाडा ता़शिरपूर येथील जि़प़ शाळेचे शिक्षक किरण कोळी हे मुलांच्या शोधार्थ २८ नोव्हेंबर रोजी मार्गस्थ झालेत़ त्या दिवशी चोपडा तालुक्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, म्हणून किरण कोळी यांनी आपला मोर्चा यावल तालुक्यातील शाळांकडे वळवला. सर्वात आधी चिंचोली गाव गाठलं़ गावकरी हे भटके असल्याने पत्ता तसा निश्चित नसतोच म्हणून विचारत-विचारत शेतातील वस्ती गाठली़ पालक अपेक्षेप्रमाणे नव्हतेच़ आई होती, त्यांच्याकडून समजलं की चिंचोलीला प्रवेश घेणाºया पाच विद्यार्थ्यांपैकी फक्त एकच विद्यार्थी येथे आहे बाकी चार विद्यार्थी आडगाव व लोणी या गावाला आहेत.
जागा बदलणं, गाव बदलणं हे तर त्यांचे नित्याचेच पण आता त्यांचा नियोजित प्रवास वाढला होता़ अनपेक्षितपणे त्यांच्या यादीत दोन गाव वाढली होती़ आता एकूण चार गाव झाली. त्यातल्या एका मुलीला शाळेत प्रवेश द्यावा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा चिंचोली ता़यावल जि़जळगाव़ येथे गेले आणि रीतसर त्या मुलीला शाळेत प्रवेश दिला. त्यानंतर आडगावला निघाले. सातपुडयाच्या पायथ्याशी असल्याने राखीव घनदाट जंगल आणि त्यातही या भटक्या लोकांना जंगलात शोधून काढणं म्हणजे महाकठीण काम़ तब्बल दीड तास साडेचार किलोमीटर पुढे गेल्यानंतर वस्ती सापडली़ पालकांची भेट घेतली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव ता़यावल शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने दोन मुलींचा प्रवेश निश्चित केला. दुसºया दिवशी धानोरा गाव गाठले. वस्तीवर जाण्यासाठी पालकांना फोन केला तर ते स्वत:हून मुलं घेऊन शाळेत आले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा धानोरा ता़चोपडा येथेही उत्तम प्रकारे एकूण पाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला. आता वेळ होती लोणीला जायची़ लोणीतील वस्ती ही मूळ गावापासून सुमारे तीन किलोमीटर लांब आणि नदीच्या पात्रातुन होता़ तरी लोणीतील वस्ती शोधण्यात यश मिळालं, आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी, ता़चोपडा़ या शाळेनेही खुल्या मनाने मुलींना आपल्यात सामावून घेतलं. तेथून ते वर्डीत गेले. त्या मुलाचे घर शोधले. घर सापडलं पण मुलगा भेटला नाही. मग तेथील जि़प़ शाळेतील शिक्षकांना अडचण सांगितली. तेथील गुरुजींनी स्वत:हून विश्वास देत सांगितले की, संध्याकाळ होत आली आहे, तुम्हाला शिरपूर गाठायचे आहे म्हणून तुम्ही शिक्षण हमीकार्ड आमच्याकडे द्या, उद्या मी स्वत: जाऊन त्या मुलाला शाळेत आणेल़ अशा प्रकारे शिक्षक किरण कोळी यांनी स्थलांतरीत बालकांना थेट प्रवेश मिळवून देत शिक्षणाचा प्रवाहात आणले़ त्यांच्या धाडसी उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी एस़सी़पवार, विस्तार अधिकारी डॉ़नीता सोनवणे, केंद्रप्रमुख के़व्ही़भदाणे यांनी कौतुक केले़