माजी महापौरांकडून कापडी पिशव्यांचे वाटप
धुळे : शहरातील भांग्यामारोती व्यायामशाळेचे मल्ल स्वर्गीय रामभाऊ सोनुजी करनकाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त माजी महापौर भगवान करनकाळ यांनी गरजू महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप केले. वाडीभोकर रोडवरील पद्मश्री टाॅवरच्या हॅप्पी मार्ट येथे आयोजित कार्यक्रमास भाजपचे प्रतोद संजय शर्मा तसेच खान्देशभूषण कुंभार गुरुजी यांच्या कन्या शकुंतलाबाई आणि ज्योती कुंभार उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी बार असो.चे अध्यक्ष ॲड.डी.जी. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे, पराग अहिरे, विजय पोलीस वसाहतीचे अध्यक्ष ॲड. धर्मराज महाजन, ॲड.राजेंद्र गुजर, देवीदास चौधरी, उद्योजक अनिल चौधरी, मुन्ना पठाण उपस्थित होते. सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर, पांडुरंग गायकवाड यांनी केले.
मोघण शिवारात जादा ट्रान्सफाॅर्मरची मागणी
धुळे : तालुक्यातील ढाढरे आणि मोघण शिवारात कमी क्षमतेचे ट्रान्सफाॅर्मर बसविले असल्याने वेळेवर पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या कांदा, मका, गहू पिकांचे नुकसान होत आहे. शेताला वेळेवर पाणीपुरवठा व्हावा यासाठी याठिकाणी जादा क्षमतेचे ट्रान्सफाॅर्मर बसविण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन परिसरातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.
महामार्गावरील
पुलाची दुरवस्था
धुळे : येथील कृषी महाविद्यालय व फागणे गावाजवळ असले ल्या दोन्ही पुलांवर खड्डे पडल्याने, अपघाताचे प्रमाण वाढले असून, खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. सुरत-नागपूर महामार्गावर दिवसरात्र अवजडसह दुचाकी वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती आहे. पुलाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जमानागिरी रोडवर
घाणीचे साम्राज्य
धुळे : येथील जमनागिरी रोडवरील शासकीय वसाहत, कारागृह कर्मचाऱ्यांच्या वसाहत आणि इतरही वसाहतींमध्ये स्वच्छतेची गरज आहे. शहरातील जिल्हा कारागृहाच्या कर्मचारी वसाहतीत मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे वाढले असल्याने त्याठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण अधिक असल्याने वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दूध डेअरी परिसरात व्हायफाय सुरू करा
धुळे : शहरातील देवपूर, साक्री रोड, अग्रवाल नगर भागात बीएसएनएल आणि कंपनीचे टाॅवर आणि केबल असल्यामुळे या भागात व्हायफाय सेवा सुरू आहे. त्यामुळे या भागातील लोकांना मोबाइल आणि इंटरनेट सर्व्हिस चांगली मिळते; मात्र शहरात शासकीय दूध डेअरी परिसर, भाईजी नगर या भागात बीएसएनएल आणि अन्य खासगी कंपनीची केबल गेली नसल्यामुळे या भागात मोबाइल सेवा विस्कळीत आहे, तसेच इंटरनेट व्हायफाय कनेक्शनसुद्धा मिळत नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रिक्षाचे दर अनियंत्रित
धुळे : शहरात तीनचाकी रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यातून अनेकांना रोजगार मिळत असतो. मात्र, शहरात रिक्षांचे दर अनियंत्रित आहेत. थोड्या अंतराचेही जास्त पैसे घेतले जातात, असा प्रवाशांचा अनुभव आहे.