मास्कने लिपस्टीकची लाली घालविली, ब्युटी पार्लरही बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST2021-04-30T04:45:18+5:302021-04-30T04:45:18+5:30
धुळे : कोरोनाच्या संसर्गामुळे साऱ्यांनाच मास्क वापरावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या महिला देखील पूर्णवेळ मास्क ...

मास्कने लिपस्टीकची लाली घालविली, ब्युटी पार्लरही बंद!
धुळे : कोरोनाच्या संसर्गामुळे साऱ्यांनाच मास्क वापरावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या महिला देखील पूर्णवेळ मास्क वापरत आहेत. मास्कमुळे त्यांना मेकअप करता येत नाही किंवा लिपस्टीक देखील लावता येत नाही. शिवाय मास्कमुळे मेकअप करुन काही फायदाच होत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मास्कने महिलांच्या लिपस्टीकची लाली घालविली आहे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, शासनाने जारी केलेल्या कठोर निर्बंधांमुळे ब्युटी पार्लरसह काॅस्मेटिकची दुकाने बंद आहेत. त्यामुळे मेकअप करण्याचा किंवा साैंदर्य प्रसाधने खरेदी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे असली तरी काही हाैशी महिला आपल्या नेहमीच्या ब्युटी पार्लरवर किंवा साैंदर्य प्रसाधनांच्या दुकानावर जावून गुपचूप खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. काही दुकानदार शटर डाऊन करुन विक्री करीत आहेत तर ब्युटी पार्लर देखील बंद दरवाजाच्या आत किंवा होम डिलीव्हरीसारखे सुरु आहेत. यामागचे महत्वाचे कारण लग्न समारंभ आहेत. कठोर निर्बंध असले आणि २५ वऱ्हाडींच्या उपस्थितीत दोन तासात लग्न आटोपण्याचा नियम असला तरी लग्नांमध्ये नियमबाह्यपणे गर्दी होत आहे. पुरुषांकडून नियमांचे पालन तर होतच नाही. पंरतु आपला मेकअप दाखविण्यासाठी महिला देखील लग्नातील गर्दीच्या ठिकाणी योग्य पध्दतीने मास्क वापरणे टाळत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या नियमबाह्य वागण्यामुळे १५ दिवसांच्या निर्बधांमध्ये कोरोनाची संसर्ग साखळी खंडित करण्यात यश मिळाले नाही. त्यामुळेच शासनाने आणखी १५ दिवस मुदत वाढवली आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर लाॅकडाऊन असाच वाढत राहिल यात शंका नाही.
चोवीस तास घरातच, ब्युटी पार्लर हवे कशाला?
कोरोनाचा संसर्ग असल्याने जीव वाचविण्यासाठी घरात राहणे आवश्यक आहे. जीवापेक्षा ब्युटी पर्लरला जाणे महत्वाचे नाही. २४ तास घरातच रहावयाचे असल्याने ब्युटी पार्लर हवे कशाला...
ब्युटी पार्लरमध्ये संपर्क आणि स्पर्श अतीशय जवळून असतो. त्यातून संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच शासनाने ब्युटी पार्लर बंदचे आदेश दिले आहेत. बंदमुळे व्यवसायात नुकसान होत आहे. पंरतु जीवापेक्षा पैसा महत्वाचा नाही. कोरोनावर मात करायची आहे.
- रुपाली चव्हाण, ब्युटी पार्लर चालक
दुकाने सुरु करा
लाॅकडाऊनमुळे गेली १५ दिवस दुकाने बंद आहेत. आता मुदत वाढवल्याने पुन्हा बंद राहतील. त्यामुळे व्यवसाय बुडतो आहे. ग्राहकांचीही गैरसोय होत आहे. पूर्णवेळ नव्हे पण काही तास दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी. रोजी बुडते आहे.
- दिनेश पवार, काॅस्मेटिक विक्रेता
आवश्यकता नाही
कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी गर्दी आणि संपर्क टाळणे तसेच घरातच राहणे आवश्यक आहे. साैंदर्य प्रसाधने किंवा ब्युटी पार्लर जीवनावश्यक नाही. जीव वाचविणे महत्वाचे आहे. काही दिवस लिपस्टीक लावली नाही तर काही बिघडत नाही.
- प्रणिता बोरसे, शिक्षिका
आवश्यकता नाही
ब्युटी पार्लरला जाणे किंवा साैंदर्य प्रसाधने खरेदी करणे खुप महत्वाचे नाही. त्यासाठी दररोज खरेदी करण्याची गरजही नसते. याआधी घेतलेली साैंदर्य प्रसाधने आहेत. शिवाय २४ तास घरातच रहावयाचे असल्याने मेकअप हवा तरी कशाला?
- जयश्री पावरा, गृहिणी