ट्रक-रिक्षा अपघातात युवतीचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:21 IST2018-11-26T23:20:40+5:302018-11-26T23:21:10+5:30
आर्वीनजिक घटना : घटनास्थळी गर्दी झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत, गुन्हा दाखल

ट्रक-रिक्षा अपघातात युवतीचा करुण अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील आर्वी नजिक ट्रक आणि अॅपेरिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात एका युवतीचा जागीच करुण अंत झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी सकाळी घडली़ यावेळी बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती़ दरम्यान, परिसरातील नागरिक मदतीसाठी सरसावले होते़
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे तालुक्यातील आर्वीनजिक एमएच १७ एजे ६७४७ क्रमांकाची रिक्षा आणि एनएल ०२ एन ७२७३ क्रमांकाचा ट्रक यांच्यात अपघात झाला़ ही दोनही वाहने धुळ्याकडून मालेगावच्या दिशेने जात होती़ अपघाताची ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास झाली़ ट्रकमध्ये रिक्षा घुसल्याने रिक्षांमधील प्रवाश्यांना जबर दुखापत झाली़ यात आर्वी येथे राहणारी अश्विनी संजय पाटील (१८) ही युवती ट्रकच्या चाकात आल्याने तिचा जागीच मृत्यू ओढवला़ अपघाताची घटना घडल्यानंतर नागरीकांनी मदतीसाठी धाव घेतली़ त्या सर्व जखमींना मिळेल त्या वाहनाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती़ पोलिसांनी देखील अपघातस्थळी धाव घेतली़ नागरीकांच्या गर्दीमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला़