मोटारसायकल रॅली, प्रतिमा पूजन करून शहीदांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 12:40 IST2019-03-24T12:39:37+5:302019-03-24T12:40:17+5:30
धुळे जिल्हा : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रतिमा पूजन, हस्ती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या शहीदांच्या वेशभूषा

dhule
धुळे : २३ मार्च १९३१ रोजी क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू, आणि सुखदेव यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी या तिघांनीही क्रांतीकारी लढा दिला होता. त्यामुळे या तीन वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद दिवस साजरा करण्यात आला. शहरासह जिल्ह्यात प्रतिमा पूजन, तसेच मोटारसायकल रॅली काढून शहीदांना अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय
शहीद दिनानिमित्त शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम झाला. उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रमोद भामरे यांनी शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन केले. यावेळी नायब तहसिलदार साबळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक कार्यालय
पोलीस अधीक्षक कार्यालयातही शहीदांना अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्याहस्ते शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भूजबळ, पोलीस निरीक्षक भरत जाधव, प्रदीप पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
दुचाकी रॅली
धुळे जिल्हा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे शहीदांना अभिवादन करण्यात आले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅली बारापत्थर, जुना आग्रारोड मार्गे महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. यावेळी हिरालाल परदेशी, कॉ.एल. आर.राव, पोपटराव चौधरी, हिरालाल सापे, एस.यू. तायडे, वसंत पाटील, बापू गर्दे, दीपक सोनवणे, प्रशांत वाणी, योगेश माळी, शरद पाटील, अजय चौधरी, राजेंद्र चौरे आदी उपस्थित होते.
हस्तीस्कूल दोंडाईचा
हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु कॉलेज येथील लिओ क्लब दोंडाईचा हस्ती एंजल्स अँड जिनिअसतर्फे 'शहिद दिन' साजरा करण्यात आला.
सुरुवातीला शहिद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी व प्राचार्य एस.एन.पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविक आठवीची विद्यार्थिनी उन्नती सुर्यवंशी हिने केले. यानंतर भूमि माखीजा, दिशा जैन व पूर्वा पवार यांनी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्याविषयी माहिती सांगितली. मनोज ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. शहीद दिनाचे औचित्य साधून आठवीचे विद्यार्थी धिरज गुजराथी, सूरज पाटिल व स्वयं बोरसे यांनी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या वेशभूषेत व्यासपिठावरून संवाद-संभाषणे केली. तर हितार्थ अग्रवाल, उमेश जैन व धिरज शिंत्रे यांनी इंग्रज शिपाई वेशभुषा साकारल्या. े सूत्रसंचालन भूमिका निगम व रागिणी गांगुर्डे या विद्यार्थिनींनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.हस्ती स्कूल येथे दरवर्षी नियमितपणे दिन विशेषातंर्गत अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याद्वारा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात व त्यांच्यावर देशभक्ती आणि ऐतिहासिक जाणीवांचे संस्कार रूजविले जातात. सोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकासासही चालना मिळते.