होळी उत्सवासाठी बाजारपेठ सजली, डोलचीला सर्वाधिक मागणी

By देवेंद्र पाठक | Published: March 23, 2024 12:47 PM2024-03-23T12:47:15+5:302024-03-23T12:48:31+5:30

गॉगल्स, पिचकाऱ्या ठरताहेत सुपरहिट

market decorated for holi festival in dhule | होळी उत्सवासाठी बाजारपेठ सजली, डोलचीला सर्वाधिक मागणी

होळी उत्सवासाठी बाजारपेठ सजली, डोलचीला सर्वाधिक मागणी

देवेंद्र पाठक, धुळे : होळी उत्सवासाठी शहरातील बाजारपेठ सजली आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही डोलचीला सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय गॉगल्स आणि पिचकाऱ्या घेण्याकडे लहानग्यांचा कल सर्वाधिक आहे. चौका चौकात रंगाची उधळण सुरु झाली असून पारंपारीक गाण्यांचा सूर कानी पडू लागला आहे. नैसर्गिक रंगाच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

इको फ्रेंडली होळीत वेगळेपणा आणण्यासाठी बहुतेकांचा विनोदी, भयावह, पक्षी, प्राणी कॉमिक्समधील हिरो असे विविध प्रकारचे मुखावटे परिधान करुन फिरणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. मुले, युवक युवतींसह प्रौढांनाही या मुखवट्याचे आकर्षण आहे.

मुखवट्यांना मागणी

बाजारात चांगली मागणी वाढलेली आहे. २० ते १०० रुपयांपर्यंत मुखवटे विक्रीला आहेत. त्यात प्लॅस्टिक, रबरी मुखावट्यांचा समावेश आहे. त्यांना मागून कापडाने शिवल्यामुळे ते चेहऱ्यावर घातले की मानेपर्यंत संपुर्ण चेहरा झाकला जातो. मुखवटा घातलेली व्यक्ती कोण हे सहज लक्षात येत नाही.

पिचकारीसह गॉगल्सची विक्री

क्रीश चित्रपटातील गॉगल्सचा लहान मुलांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे. पिचकारीला लहान मुलांसह युवकांकडूनही पसंती मिळत आहे. एव्हाना पिचकाऱ्यांचे आकारही आकारही चांगलेच देखणे मजबूत आले असून पारंपारीक पिचकाऱ्यांसह पंपाद्वारे पाणी सोडणाऱ्या विविधरंगी लहानमोठ्या आकाराच्या २५ ते ४०० आणि ५०० रुपयांपर्यंतच्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीला आहेत.

हार-कंगणाला मागणी

हाेळीनिमित्त बाजारात साखरेपासून तयार केलेले हार कंगण विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. होळीनिमित्त पुजेसाठी याचा वापर हाेत असतो. त्यामुळे चौकाचौकात हार कंगणची दुकाने थाटली आहे. ८० ते १०० रुपये किलो दराने त्याची विक्री होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी भावात वाढ झालेली आहे.

चौकाचाैकात जय्यत तयारी

शहरातील वाडीभोकर रोडवरील उत्तरमुखी मारुती मंदिर चौक, सहावी गल्ली, भगवा चौक, खोल गल्ली, मोगलाई, रेल्वे स्टेशन चाैक, अग्रसेन चौक यासह विविध ठिकाणी होळीचा उत्सव साजरा होत असल्याने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याठिकाणी पारंपारीक गाण्यांचा आवाज कानी पडण्यास सुरुवात झालेली आहे.

Web Title: market decorated for holi festival in dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी 2024