पैशांसाठी विवाहितेचा छळ, गुन्ह्याची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST2021-08-27T04:39:38+5:302021-08-27T04:39:38+5:30
२ लाखांसाठी विवाहितेचा छळ, गुन्ह्याची नोंद धुळे : कार घेण्यासाठी माहेरून २ लाख रुपये आणावे या मागणीसाठी विवाहितेचा सासरी ...

पैशांसाठी विवाहितेचा छळ, गुन्ह्याची नोंद
२ लाखांसाठी विवाहितेचा
छळ, गुन्ह्याची नोंद
धुळे : कार घेण्यासाठी माहेरून २ लाख रुपये आणावे या मागणीसाठी विवाहितेचा सासरी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. सततच्या जाचाला कंटाळून रूपाली राहुल पाटील (रा. अकलुज, ता. यावल; हल्ली मुक्काम तरडी, ता. शिरपूर) या विवाहितेने थाळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पती राहुल नानाजी पाटील यांच्यासह ३ जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
तरुणाची गळफास
घेऊन आत्महत्या
धुळे : शहरातील आझादनगर, वडजाई रोड मारुती मंदिराजवळ राहणारा समीर शाह बशीर शाह (२८) या मजुरी करणाऱ्या तरुणाने त्याच्या राहत्या घरी लोखंडी अँगलला नायलॉनच्या दुपट्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना २४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
घटना लक्षात येताच समीर शाह याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पालाबाजार भागात
जुगार अड्ड्यावर धाड
धुळे : शहरातील पालाबाजार येथील दंडेवाले बाबा हॉटेलच्या परिसरातील बंद टपरीच्या अडोश्याला जुगाराचा खेळ सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली. माहिती मिळताच बुधवारी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. जुगार खेळणारे बाकीचे पळून गेले. पण, आत्माराम भीमराव पवार (६५, रा. राजकमल टॉकिज, फॉरेस्ट ऑफिससमोर, धुळे) याला पकडण्यात आले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, ८१० रुपये रोख व जुगाराची साधने जप्त करण्यात आली.
गुरे वाहून नेणारा
टेम्पो पकडला
धुळे : तालुक्यातील शिरडाणेकडून कावठी गावाकडे जाणारा टेम्पो
(क्र. एमएच ०४ एस ८२८७) या मार्गावर असलेल्या पाटाच्या अलीकडे संशयावरून पकडण्यात आला. टेम्पोची तपासणी केली असता गुरे आढळून आली. २ लाखांचा टेम्पो आणि ३ हजारांची गुरे असा एकूण दोन लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी सकाळी सव्वाअकरा सुमारास करण्यात आली. याप्रकरणी सोनगीर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.