मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील पश्चिम भागातील ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या झाल्या. यावेळी दोन गटांमध्ये समोरासमोर लढत होऊन भारतीय जनता पक्षाच्या रावल गटाने निर्विवाद बहुमत प्राप्त केले असून, आज सरपंच पदाच्या सोडतीनंतर सरपंच पदासाठी अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आपल्या नेत्यांजवळ संपर्क साधण्यासाठी अनेकांकडून धडपड सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुराय ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वसाधारण गटाचे आरक्षण पडले आहे. त्यानंतर सरपंच पदासाठी उज्जनबाई पांडुरंग जाधव व गुलाब बाबुलाल पाटील यांच्या नावाची गावात जोरदार चर्चा होत आहे. यासाठी अडीच वर्षांचा फाॅर्म्युला राबविला जाणार असल्याची सुत्रांची माहिती असून, आता सरपंचपदी प्रथम कोणाची वर्णी लागते, याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागून आहेत.
कर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीही सर्वसाधारण आरक्षण पडले असून, सरपंच पदासाठी विद्यमान सरपंच साहेबराव पवार यांच्या पत्नी रेखा साहेबराव पवार व सीमा दिनेश ठाकरे यांच्या नावाची गावात चर्चा होत आहे. परसोळे ही शिंदखेडा तालुक्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत असून, येथे सात ग्रामपंचायत सदस्य असून, भाजपच्या जयकुमार रावल गटाने येथील सर्व जागा जिंकल्या आहेत तर विरोधकांना येथे खातेही उघडता आलेले नाही. सरपंच पदासाठी या ग्रामपंचायतीत ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पडले असून, येथे कोकिळाबाई मोहन पाटील व सीमा संदीप पाटील यांच्या नावाची चर्चा होत असून, येथेही अडीच वर्षांच्या फाॅर्म्युल्याची जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे आता सरपंचपदी कोणाची वर्णी प्रथम लागते, यासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.