मनमाडजीन भागात चोरट्याची हातसफाई, ५० हजारांचा ऐवज लांबविला, गुन्हा दाखल
By देवेंद्र पाठक | Updated: September 11, 2023 16:50 IST2023-09-11T16:49:42+5:302023-09-11T16:50:26+5:30
आझादनगर पोलिस ठाण्यात रविवारी सायंकाळी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मनमाडजीन भागात चोरट्याची हातसफाई, ५० हजारांचा ऐवज लांबविला, गुन्हा दाखल
धुळे : बंद घराचा फायदा घेत चोरट्याने घरातील किमती सामान लांबविल्याची घटना पारोळा रोडवरील मनमाडजीन भागात रविवारी उघडकीस आली. यात चोरट्याने ५० हजारांचे विविध घरगुती साहित्य लांबविले. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात रविवारी सायंकाळी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चहाविक्रेता स्वप्निल सुनील गवळी (वय २८, रा. गल्ली नंबर ७, सोनदेव वाडा चौक, मनमाड जीन, धुळे) या तरुणाने आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गवळी परिवार कुठे बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद होते. चोरट्याने ही संधी साधून घराला लावलेले कुलूप तोडले. घरात प्रवेश करत संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करत घरात शोधाशोध केली. लोखंडाचे कपाट शोधून काढून ते फोडण्यात आले. त्यात ठेवलेली रोख रक्कम, दागिने, चांदीचे शिक्के याशिवाय घरातील पितळी भांडे, असा एकूण ४७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने चोरून नेला.
चोरीची ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा ते शनिवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली. गवळी परिवार घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेडकॉन्स्टेबल एस. एस. सोनवणे घटनेचा तपास करत आहेत.