धुळ्यातील नाकाबंदीत गुटखासह लक्झरी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 22:50 IST2019-12-07T22:50:07+5:302019-12-07T22:50:38+5:30
३१ लाख ३६ हजार : पहाटेची कारवाई

धुळ्यातील नाकाबंदीत गुटखासह लक्झरी जप्त
धुळे : शहरातील गिंदोडिया चौकात आझादनगर पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत लक्झरीत लपवून ठेवलेला १ लाख ३६ हजाराचा गुटखा आणि ३० लाखांची लक्झरी बस असा एकूण ३१ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली़
अवैध धंदे आणि वाढणाऱ्या घरफोड्या यांना आळा बसावा यासाठी पोलीस ठाणे निहाय वेळोवेळी नाकाबंदी करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे़ यानुसार, शहरातील गिंदोडीया चौकात आझादनगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली नाकाबंदी लावण्यात आली होती़ लहान मोठ्या सर्वच वाहनांची तपासणी करण्याचे काम सुरु होते़ अशातच शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जीजे १९ एक्स ९५९६ क्रमांकाची लक्झरी बस आली़ या बसची देखील तपासणी करण्यात आली़ बसमध्ये संशयितरित्या ठेवण्यात आलेले १२ बॉक्स आढळून आले़ या बॉक्सची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ आढळून आले़ त्यात १ लाख ३६ हजार रुपये किंमतीचा साठा आणि ३० लाख रुपये किंमतीची बस असे एकूण ३१ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
याप्रकरणी लक्झरी चालक शेख आफिज शेख अजीज (३२, रा़ सुरत) आणि सहचालक विकास कालू नेगवाल (२५, रा़ उदयपूर) यांना चौकशीकामी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली़ अन्न आणि औषध प्रशासन विभागाला पाचारण करण्यात आले असून पुढील कारवाई केली जाणार आहे़
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली एऩ एम़ सहारे, गवळे, आव्हाड, देसले, दीपक पाटील, गुरव, पवार, राहुल पारधी, इंद्रजित परदेशी, योगेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे़