यंदा भरपूर आमरस; केशर ८० रुपये किलो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST2021-05-11T04:38:31+5:302021-05-11T04:38:31+5:30
धुळे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वपूर्ण अक्षय तृतीया सणासाठी धुळे शहराच्या बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली आहे. परंतु आंब्यांच्या व्यवसायावर ...

यंदा भरपूर आमरस; केशर ८० रुपये किलो!
धुळे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वपूर्ण अक्षय तृतीया सणासाठी धुळे शहराच्या बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली आहे. परंतु आंब्यांच्या व्यवसायावर यंदा कोरोनाचे सावट असल्याने हा व्यवसाय निम्म्यावर आल्याचे घाऊक व्यापारी मुख्तार बागवान यांनी सांगितले.
कोरोनाचे सावट असले तरी आंब्यांचे दर अवाक्यात असल्याने यंदा भरपूर आमरसाची चव चाखण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे. त्यासाठी बाजारात केसर, बदाम, लालबाग, हापूस, सरकुलस, पायरी आदी आंब्यांची आवक वाढली आहे. केसर ८० रुपये तर बदाम आणि लालबाग ६० रुपये प्रतिकिलो मिळत आहे.
आमरसाकरिता या आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. कापून खाण्यासाठी तसेच रस करण्यासाठी हापूस आंब्यालादेखील उच्चवर्गीयांकडून मागणी असते. वेगवेगळ्या हापूस आंब्याचे दर यंदा बाजारात १०० ते २२० रुपयांपर्यंत आहेत.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ट्रकमधून माल मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. तसेच अकबर चाैकातील व्यापाऱ्यांकडे देखील आंब्याची आवक होत आहे. बाजार समितीमध्ये आडत व्यापाऱ्यांना हा माल विक्रीचे प्रयत्न करावे लागतील.
आवक वाढली ग्राहक रोडावले
अक्षय तृतीया सणाच्या निमित्ताने बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. परंतु कोरोनामुळे ग्राहक रोडावल्यासारखी परिस्थिती आहे. कोरोना संसर्गाचा परिणाम संर्वच घटकांवर झाला आहे. कठोर निर्बंधांमुळे सकाळी केवळ ११ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु असते. बरेच जण उशिरा उठतात. त्यामुळे वेळेवर बाजारात पोहोचू शकत नाहीत. शिवाय अनेकजण कोरोनामुळे बाहेर पडताना दिसत नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये दु:खद घटना घडल्या आहेत तर अनेक कुटुंबे अजूनही कोरोनाने ग्रस्त आहेत. त्यामुळेदेखील ग्राहकांची संख्या रोडावली आहे. खवय्यानी मात्र आंब्याची चव चाखण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. असे असले तरी आंब्याच्या बाजारावर कोरोनाचा परिणाम आहे. व्यवसाय निम्म्यावर आला आहे.
विविध राज्यांतून आंब्याची आवक
शुक्रवारी सर्वत्र अक्षय तृतीया साजरी होत असून या पार्श्वभूमीवर यंदाही गुजरात, बलसाड, चाकूर आणि जुनागडमधून केसर आंबा दाखल झाला आहे. याबरोबरच रत्नागिरी येथून पायरीची आवक आहे. याशिवाय हैदराबादमधून बदाम मोठ्या प्रमाणात येत आहे. गावराण आंब्याची आवक नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातून तसेच साक्री तालुक्यातूनदेखील होते. आमरसाकरिता गावरान आंब्यांना फारशी मागणी नसते. परंतु आर्थिक परिस्थितीनुसार काही जण अवाक्यात असलेले गावराण आंबे हमखास खरेदी करतात.
यंदा आंब्याची आवक वाढली असली तरी मालाला उठाव नाही. आंब्यांच्या बाजारावर कोरोनाचे सावट आहे. सकाळी ११ पर्यंतच बाजार सुरू असतो. त्यामुळे ग्राहक वेळेत पोहोचू शकत नाहीत. अक्षय तृतीया सणामुळे आंब्यांच्या बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. व्यवसाय निम्म्यावर आला आहे. - मुख्तार बागवान, होलसेल व्यापारी
किरकोळ बाजारात आंब्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. परंतु कठोर निर्बंधांमुळे पुढे काय होईल हे कळायला मार्ग नाही. मागणी तुलनेने ५० टक्क्यांवर आली आहे. अक्षय तृतीयेला व्यवसायात तेजी येऊ शकते. सणासाठी केसर, बदाम, लालबागला सर्वाधिक मागणी असते. - संदीप कोठावदे, किरकोळ व्यापारी