धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने गहु, हरभरा, मक्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 21:38 IST2020-03-27T21:38:17+5:302020-03-27T21:38:42+5:30
सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस : मातीची घरे कोसळल्याने नागरिक बेघर

धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने गहु, हरभरा, मक्याचे नुकसान
धुळे : जिल्ह्यात धुळे शहरासह साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टयात शुक्रवारी सलग तिसºया दिवशीही पाऊस झाला. पावसामुळे गहू, हरभरा, मका, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती आहे.
साक्री तालुक्यात पश्चिम पट्टयात पिंपळनेरसह आदिवासी पाडयामध्ये दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे परिसरातील शेतामध्ये उभे असलेले गव्हाच्या पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. याशिवाय हरभरा, मका आणि कांदा पिकाचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान होण्याची भीती आहे. धुळे शहरासह तालुक्यातही वणी, नवलनगर, फागणे गावातही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गहू, कांदा अन्य पिकांचे नुकसान झाले़
धुळ्यातही पाऊस
वातावरणात गारवा
धुळे - शहरात शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास सुमारे १० मिनिट चांगला पाऊस झाला. त्यानंतर दुपारी ऊन - सावलीचा खेळ सुरु होता. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास सुमारे दहा मिनिटे परत पाऊस झाला. त्यामुळे उंचसखल भागात पाणी साचले होते़ तर मिरची पथाारीवर मिरची वाचविण्यासाठी मात्र चांगलीच धांदल उडाली होती़
वाल्हवेत अवकाळी पाऊस
आमदारांकडून पाहणी
निजामपूर - साक्री तालुक्यात वाल्हवे व परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस आणि गारपीठ झाल्याने घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची आमदार मंजुळा गावित यांच्या अधिकाºयांनी पाहणी केली़ कुटुंबियांची भेट घेतली़ परिणामी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वादळाने गावातील घरांचे पत्राचे शेड, कौलारू घरे, झाडांसह विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. या वादळात शामलाल साहेबराव सुर्यवंशी, निशा प्रभाकर गायकवाड, तुळशिराम काशीराम पवार, महारु झिंगा पवार, वारु काळु वाघ, देविदास पंडीत सुर्यवंशी, रामू मंगा पवार, काशिनाथ गणपत पवार, अशोक हरी गायकवाड, मिरुलाल दयाराम पवार, पंडित दयाराम पवार, शिल्पू सखाराम ठाकरे, संजय भजन पवार, उत्तम पवळू पवार, यांच्या घरासह गावातील अन्य घरांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाल्याने कुटुंब उघड्यावर आले़ ग्रामसेवक डी़ डी़ पाडवी, सरपंच नानजी अहिरे, पोलीस पाटील धीरज पवार, तलाठी युनूस सैय्यद यांनी पाहणी व पंचनामा करीत आहेत. आमदार मंजुळा गावित यांनी नुकसानीची पाहणी केली. शासन स्तरावरून नुकसान ग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यावेळी त्यांचे सोबत पिंपळनेर अप्पर तहसीलदार थविल, साक्रीचे गट विकास अधिकारी जे़ टी़ सूर्यवंशी होते.
थाळनेर परिसरात
शेतकरी संकटात
थाळनेर - शिरपूर तालुक्यातील थाळनेर सह परिसराला शुक्रवारी पहाटे परिसराला अवकाळी पावसाने झोडपल्याने रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. थाळनेरसह परिसरातील भोरटेक, भाटपुरा, मांजरोद, भोरखेडा, आदी गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला़ शेतकºयांचे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. यात शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे़ शेतीच्या नुकसानीने शेतकरी पूरता हवालदिल झाला आहे. गुरुवारी सकाळ पासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. पहाटे विजेच्या कडकडासासह वादळी पाऊस झाला. तब्बल अर्धा तास पाऊस झाल्याने शेतपिक जमीनदोस्त झाली आहेत. या नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने कृषी विभाग व महसूल मंडळाने पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे़
विजेच्या कडकडाटासह
पावसाच्या जोरदार सरी
मालपूर - शिंदखेडा तालुक्यातील मालपुर सह संपूर्ण परिसरात गुरुवारी रात्री ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या़ वातावरणात गारवा निर्माण झाल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त दिसुन आला. संपूर्ण परिसरात अवकाळी पावसाचे चिन्हे दिसत असल्यामुळे रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे़ आधीच संपूर्ण खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे गेला आहे. शेतीत टाकलेला पैसा देखील या हंगामातुन निघणार नाही, अशी स्थिती आहे़ वादळी वाºयांमुळे शेतकºयांचा गहू संपुर्ण आडवा पडुन मोठे नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा तसेच कांदा पिकावर आळ्यांचा प्रादुर्भाव होवुन नुकसानीलाच सामोरे जावे लागणार आहे. बहरलेल्या पिकाला अवकाळी व ढगाळ वातावरण खुप धोक्याचे असते, असे येथील जाणकार शेतकरी सांगताना दिसुन आले व आज दिवसभर चिंतेचे वातावरण पसरले होते. तसेच मिरची पिकाला ही फटका बसला असून नागरिकांनी देखील वर्षभरासाठी चटणी म्हणून घेतलेल्या मिरच्या आपापल्या धाब्यावर वाळवायला टाकल्या होत्या़ त्या देखील अस्ताव्यस्त होवुन आवरण्यासाठी धांदल उडाली होती़
पिके झाली उध्द्वस्त, लाखोंचा फटका
शिरपूर/उंटावद - शिरपूर तालुक्यातील तºहाडीसह परिसरातील वरुळ, भटाणे, जवखेडा, लोंढरे, ममाणे, अभानपुर भागात वादळी वाºयासह पाऊस आणि गारपीट झाली. अनेक भागातील शेतात गारांचा खच पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या शेतातील हाताशी आलेल्या रबी पिकांना जोरदार फटका बसला. भाजीपाला पीकही उध्द्वस्त झाले. यात शेतकºयांची लाखोंची हानी झाली आहे. परिसरातील अनेक घराचे छपरे उडून गेले, कच्चे घरे व झोपड्या ढासळल्या. अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. रस्त्यावर गाराचा खच जमा झाला. अनेक शेतातील बाभळी, निम, आंब्याचे झाडे कोसळले. शेतातील पिकही क्षणार्धात डोळ्यादेखत गारीपीटाच्या तडाख्याने भूईसपाट झाले. हवामानाचा अंदाज अचानक बदलल्याने शेतकºयांनी शेतमालाची सावरासावर करण्याआधीच शेतात होत्याचे नव्हते झाले. यावर्षी गावरान आंब्याचा मोहोर अत्यल्प प्रमाणात आला. ज्या काही आंब्याच्या बागांमध्ये मोहोर बहरला होता तोही या बेमोसमी पावसामुळे गळून पडला आहे. यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. असे शेतकºयांनी सांगितले़
तातडीने पंचनामा करा
जिल्ह्यातील ग्रामीण भागात खरिपामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ही नुकसान भरपाई अद्यापही शेतकºयांना मिळाली नाही. त्यातच पुन्हा वादळी वाºयासह झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे चांगलेच नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे़ याकडे कृषी विभागासह महसूल यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे़