Lockdown of workers; Entrepreneurs threatened to go to labor villages | कामगारांना लाॅकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती

कामगारांना लाॅकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती

धुळे : महाराष्ट्र शासनाने लाॅकडाऊनचे संकेत दिले आहेत. विरोधकांसह काही सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या सूचना केल्यामुळे लाॅकडाऊन जाहीर होण्यास उशीर होत असला तरी कोणत्याही क्षणी लाॅकडाऊन होऊ शकते. गेल्या वर्षीच्या वाईट अनुभवामुळे स्थानिकांसह परप्रांतीय कामगारांना लाॅकडाऊनची तर उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती लागली आहे.

शासनाने कठोर लाॅकडाऊनचे संकेत दिले असले तरी संपूर्ण राज्यात लाॅकडाऊन करायचे की केवळ कोरोनाग्रस्त जिल्ह्यांमध्ये लागू करायचे याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. कोरोनाग्रस्त जिल्ह्यांमध्ये लाॅकडाऊन करण्याचा निर्णय झाला तरी त्यात धुळे जिल्ह्याचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. कारण शहरासह जिल्ह्यामध्ये काेरोना रुग्णांची संख्या दररोज सरासरी चारशेने वाढत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. केवळ वयोवृद्धच नव्हे धडधाकड तरुणांच्या मृत्यूची उदाहरणे देखील समोर आली आहेत. केवळ धुळे जिल्हाच नव्हे राज्याच्या अनेक जिल्ह्यांंमध्ये अशीच परिस्थती आहे. त्यामुळे लाॅकडाऊन जाहीर होणार आहे. यातून उद्योगांना सूट मिळेल किंवा नाही याबाबत स्पष्टता नसली तरी मागच्या वर्षीच्या अनुभवामुळे कामगार आणि उद्योजकदेखील चिंतेत आहे. कामगारांच्या अनेक कुटुंबांनी तर स्थलांतरदेखील सुरू केले आहे. लाॅकडाऊन झाल्यावर वाहने बंद होतील म्हणून कामगार आताच गावी परतू लागले आहेत. त्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. गेल्या वर्षी उद्योगांना सवलत मिळाली होती; परंतु कामगार नसल्याने अनेक उद्योग तब्बल सहा महिने सुरू होऊ शकले नाहीत. आता सुरळीत झाले होते; परंतु पुन्हा कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे उद्योगधंद्यांवर टांगती तलवार आहे. कामगार गावी गेले तर उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

गेल्या वर्षीची आठवण

गेल्या वर्षी लाॅकडाऊन झाल्यानंतर अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाली होती. वाहतूक व्यवस्थादेखील बंद केल्याने लाखो कामगारांनी शेकडो किलोमीटरचा थक्क करणारा पायी प्रवास सुरू केला होता. महामार्गांसह इतर रस्त्यांवर कामगारांची प्रचंड गर्दी होती. यावेळीदेखील वाहतूक बंद करतील या भीतीने कामगारांनी स्थलांतर सुरू केेले आहे; परंतु तुलनेत मात्र प्रमाण कमी आहे.

हाताला काम नाही, इथे तरी काय करणार?

मागच्या वर्षी वाहतूक बंद झाल्याने पायी जावे लागले होते. खूप हाल झाले. त्यामुळे यावेळी वाहने बंद होण्याच्या आधी गावी परतणे गरजेचे आहे.

- हिराजी यादव, कामगार

कोरोनापेक्षा लाॅकडाऊनची अधिक भीती वाटते. रोजगार जातो, पैसे संपतात, आरोग्यही बिघडते. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

- त्र्यंबक सोनवणे, कामगार

लाॅकडाऊन झाल्यास उद्योजक आम्हाला सांभाळतात; परंतु आमचे नातेवाईक गावी दूर राज्यात असतात. कोरोनामुळे बरेवाईट होण्याची भीती वाटते.

- बलदेव सिन्हा, कामगार

कामगार गावी परतला तर...

कुशल मजुरांचा तुटवडा वर्षभरापासून जाणवत आहे. उत्पादन क्षेत्राची बाजारपेठेतील मागणी मंदावली आहे. परप्रांतीय मजुरांच्या जाण्याने उत्पादनावर मोठा फरक पडतो. देशांतर्गत बाजारपेठेसोबत निर्यातीवर देखील परिणाम झाला आहे. मजूर घाबरलेल्या मानसिकतेत आहे. उद्योगांसह मजुरांना जपले पाहिजे.

- राजगोपाल भंडारी, उद्योजक, शिरपूर

हाॅटेल इंडस्ट्रीचा आवाका मोठा आहे. यात हजारोंच्या संख्येने परराज्यातील विशेषत: उत्तर भारतातील मजूर आहेत. कोरोनापूर्वी वाढत जाणारा हाॅटेल व्यवसाय वर्षभरात दुपटीने खाली आला आहे. लाॅकडाऊनच्या पुनरावृत्तीचा न भरून येणारा फटका हाॅटेल व्यावसायिकांना बसणार आहे. मागील वर्षी गेलेले कारागीर परतले नाहीत.

- चंपालाल जैन, हाॅटेल झनकार पॅलेस

उद्योगांमधील कुशल कामगार परप्रांतीय आहेत. ते गेल्यास उत्पादन ठप्प होईल. लाॅकडाऊनमुळे राज्यातील उद्योगांवर दूरगामी प्रतिकूल परिणाम होणार आहे. सद्य:स्थितीत कामगार हा उद्योगांचा काैटुंबिक घटक असल्याने त्यांची सुरक्षितता व अखंडित रोजगार हे आव्हान पेलने महत्त्वाचे आहे.

- सतीश सिंगवी, कार्यकारी अध्यक्ष, स्पन पाईप्स मॅन्यु. असो. महा.

Web Title: Lockdown of workers; Entrepreneurs threatened to go to labor villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.