लाॅकडाऊनमुळे मातीपासून भांडी बनवण्याचा व्यवसाय सापडला संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:01+5:302021-06-06T04:27:01+5:30

अक्षयतृतीयेचा सणालादेखील माठ विक्री सालाबादाप्रमाणे झाली नाही. मातीचा माठ तसेच विविध वस्तू तयार करण्यासाठी मालपूर, तालुका शिंदखेडा येथील संपूर्ण ...

The lockdown put the pottery business in trouble | लाॅकडाऊनमुळे मातीपासून भांडी बनवण्याचा व्यवसाय सापडला संकटात

लाॅकडाऊनमुळे मातीपासून भांडी बनवण्याचा व्यवसाय सापडला संकटात

अक्षयतृतीयेचा सणालादेखील माठ विक्री सालाबादाप्रमाणे झाली नाही. मातीचा माठ तसेच विविध वस्तू तयार करण्यासाठी मालपूर, तालुका शिंदखेडा येथील संपूर्ण कुंभार समाजाचे कुटुंबीय या कामात व्यस्त असतात. मात्र, यावर्षी याला लाॅकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. तुलनेने सालाबादाप्रमाणे या माठाला कोरोनाच्या वातावरणामुळे मागणी घटली आहे, ग्राहकच उपलब्ध होत नसल्याचे हे व्यावसायिक सांगतात. गरिबांचा फ्रीज यावर्षी अडगळीतच पडल्याचे चित्र दिसून येत आहे. मातीचा माठ हा गरिबांचा फ्रीज समजला जातो. उन्हाळ्याची चाहूल लागताच थंड पाण्यासाठी या माठाची नागरिक मोठ्या संख्येने खरेदी करत असतात. मात्र, सध्या लाॅकडाऊन सुरू असून, ते वाढतच चालले आहे. शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्कील झाल्यामुळे साहजिकच या गरिबांच्या फ्रीजला मागणी घटली आहे. यामुळे हे माठ घरातच पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे, तर यातून साधा खर्चदेखील यावर्षी सुटला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मातीपासून लाल व काळा, असे दोन प्रकारचे माठ विविध प्रक्रिया करून मालपूर, ता. शिंदखेडा येथील कुंभार समाजाचे कुटुंबीय तयार करतात. माठ कोणताही असो मात्र तो चांगला झिरपणारा असला तर पाणी अधिक थंडगार होत असते व ते चवीलादेखील चांगले असते. आज घरोघरी फ्रीज दाखल झाले असले तरी अजूनही मातीच्याच माठाचे पाणी पिणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. मात्र, या व्यवसायाला लाॅकडाऊनचा मोठा फटका बसला असून, यावर्षी भागभांडवलदेखील निघणे मुश्कील झाले आहे, असे येथील भिकन दशरथ कुंभार यांनी सांगितले. या व्यवसायात अख्खे कुटुंब राबत असून, तुलनेने मोलमजुरी तुटपुंजी मिळते. शासनाने आम्हाला माठ विक्री करण्याची मुभा द्यावी, अशी येथील भिका कुंभार यांच्यासह या व्यवसायातील कुंभार समाजाने मागणी केली आहे.

चौकट -

मालपूर येथे मातीपासून विविध प्रकारचे संसारोपयोगी भांडी बनवली जातात. यात माठ, मडके, लोटा, रांजण, खापर चूल, दिवा, पणती आदी वस्तू बनवीत असतात व परिसरातील नागरिक येथे येऊन खरेदी करतात, तर काही व्यावसायिकांची गावे बांधली असून, ते या वस्तू त्या गावात जाऊन विक्री करतात. मात्र, कोरोनाकाळात सर्व व्यवहार बंद पडल्याचे हे व्यावसायिक सांगत असून, आता पावसाळ्याच्या तोंडावर विक्रीची मुभा द्यावी.

फोटो :-

मालपूर येथील भिका कुंभार यांचे कुटुंबीय मातीपासून असे विविध प्रकारचे माठ, मडके, लोटा, रांजण, खापर चूल, आदी वस्तू बनवीत असतात.

Web Title: The lockdown put the pottery business in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.