१४ दिवस लॉकडाऊन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 21:18 IST2020-07-06T21:17:49+5:302020-07-06T21:18:07+5:30
संविधान संरक्षण समिती : अन्यथा मृत्यूंना प्रशासन जबाबदार

dhule
धुळे : शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ मृतांचा आकडाही मोठा आहे़ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लावा, अशी मागणी संविधान संरक्षण समितीने प्रशासनाकडे केली आहे़
समितीचे पदाधिकारी वाल्मिक दामोदर, हरिचंद्र लोंढे, शशीकांत वाघ, सागर ढिवरे यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, एप्रिलमध्ये पहिला रुग्ण आढळला़ एप्रिल ते जून असे दोन महिने रुग्णांची संख्या १०० पेक्षाही कमी होती़ परंतु लॉकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना बाधितांच्या आकड्याने हजारी पार केली आहे़ मृतांचा आकडा ६७ वर पोहोचला आहे़
धुळे शहरात लॉकडाऊन शिथील केल्यानंतर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे़ दुकानांचे सम विषमचे नियोजन, सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडाला़ बाजारात गर्दी उसळली़ त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला़
जिल्ह्यातील परिस्थितीनुसार लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ लॉकडाऊनसाठी शासनाच्या वेगळ्या परवानगीची गरज नाही़ कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी आपल्या अधिकारांचा वापर करीत १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लावावा अशी मागणी संविधान संरक्षण समितीने केली आहे़
याआधी महापोर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी अशी मागणी केली होती़ तसेच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनची मागणी केली आहे़ लॉकडाऊन केले नाही आणि कोरोनाचा संसर्ग वाढला, मृत्यू वाढले तर त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार असेल, असे निवेदनात म्हटले आहे़
धुळे शहरात कोरोनाची साथ अटोक्यात ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांसह महानगरपालिकेच्या आयुक्तांवरही आहे़ या दोन्ही यंत्रणांनी पोलीस दलाची मदत घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी केली असती तर रुग्णांची संख्या वाढली नसती आणि पर्यायाने मृत्यूदरही वाढला नसता़ या तीनही यंत्रणांनी समन्वय साधण्याची गरज आहे़