विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 22:35 IST2020-04-12T22:35:27+5:302020-04-12T22:35:53+5:30
वसमार शिवार : मध्यरात्री विहिरीत पडलेल्या बिबट्याला रविवारी सायंकाळी बाहेर काढले

dhulle
म्हसदी: साक्री तालुक्यातील वसमार शिवारातील पाटगुवन मध्ये रविवारी मध्यरात्री एका शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. या बिबट्याला रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश मिळाले.
वसमार शिवारातील शेतकरी भास्कर विश्वनाथ बागुल, यांच्या विहिरीत मध्यरात्री बिबट्या पडला. तो विहिरीतील कपारीत लपून बसला. शेतकरी बागूल सकाळी शेतात गेले असता, त्यांना विहिरीतून गुरगुरण्याचा आवाज आला असता, बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती वन विभागास दिली.
माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पिंजऱ्याच्या साह्याने बिबट्याला रविवारी सायंकाळी विहिरीतून बाहेर काढून जंगलात सोडण्यात आल्याची माहिती म्हसदीचे वनपाल एस.डी. देवरे यांनी दिली. यावेळी पिंपळनेर येथील वनक्षेत्रपाल अे,आर.माळके, एम. एन. बच्छाव, डी.एन.सोनवण, डांगशिरवाडे वनपाल भूषण वाघ, म्हसदी एस. डी. चौधरी, ककांनी वनरक्षक एल. आर. वाघ, बेहड, वन कर्मचारी रमेश बच्छाव, वसंत खैरनार, भटू बेडसे, एकनाथ गायकवाड, सचिन बच्छाव, वाहन चालक विक्रम अहिरे, बाळू बेडसे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान बिबट्याला पकडून जंगलात सोडण्यात आल्याने, सर्वांनी सुटकेचा श्वास सोडलेला आहे.