दारु दुकानांमधील मद्यसाठ्याची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 21:44 IST2020-05-27T21:44:33+5:302020-05-27T21:44:57+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभाग : साठ्यात तफावत, दत्त मंदिर चौकातील दुकान केले सील

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळे : महानगरपालिका क्षेत्रातील दारु दुकाने आणि गोदामांमधील मद्यसाठ्याची तपासणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरु केली आहे़ ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ही तपासणी सुरू झाली आहे.
धुळे महानगरपालिका हद्दीतील दारु दुकाने गोदामांमधील दारुसाठ्याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ३० एप्रिल रोजी दिले होते़ परंतु महिना झाला तरी तपासणी होत नसल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये बुधवारी प्रसिध्द झाले़
त्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने महानगरपालिका क्षेत्रातील मद्यसाठ्याची तपासणी बुधवारी सकाळपासूनच सुरु केली आहे़ दारू विक्री दुकानांसमोर तपासणी पथकांच्या गाड्या थांबल्याने, बघ्यांनीही गर्दी केली होती.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मद्यसाठ्याची तपासणी सुरु असल्याने दुकाने उघडण्यात आली होती़ त्यामुळे दारु दुकाने सुरु झाल्याची चर्चा दिवसभर होती़ काही मद्यशौकीन सरळ दुकानात जावून दारुची मागणी करताना दिसले़ परंतु तपासणी सुरु असल्याचे सांगितल्याने त्यांचा हिरमोड झाला़
दरम्यान तपासणीअंती देवपूरातील दत्त मंदिर चौकातील महाराष्ट्र वाईन या दुकानात मद्यसाठ्यामध्ये तफावत आढळल्याने सदर दुकान राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे सील करण्यात आले आहे़
कारवाईची लपवाछपवी कायम
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभार संशयास्पद असल्याचे चित्र आहे़ मद्यसाठ्यात तफावत आढळलेल्या ग्रामीण भागातील २७ दारु दुकानांवर अजुनही कारवाई झालेली नाही़ शिवाय बुधवारी शहरातील दुकानांमधील मद्यसाठ्याची तपासणीची माहिती देण्यास अधीक्षक संजय पाटील यांनी टाळाटाळ केली़ लपवाछपवी कायम असल्याने संशय व्यक्त होत आहे़