आत्महत्या करणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 22:59 IST2021-01-19T22:58:39+5:302021-01-19T22:59:49+5:30
पिंपळनेर : विहिरीत महिलेने उडी मारताच इतरांनीही मारल्या उड्या, मिळवून दिले जीवदान

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण
पिंपळनेर : पांझरा नदी काठावरील सामोडे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत एका महिलेने अचानक येवून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी दुपारी अचानक घडली. महिलेने विहिरीत उडी मारल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्या काही जणांनी पटापट उडी मारुन त्या महिलेला जीवदान मिळवून दिले. त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात पांझरा नदीकाठावर सामोडे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणारी एक मोठी विहिर आहे. ही विहिर असलेले ठिकाण तसे दिवसभर वर्दळीचे असते. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास या विहिरीच्या परिसरात नागरीकांचा वावर होता. अशातच नागोबाई वैदू (५५) नावाची वडार समाजाची महिला रस्त्याने धावत आली. विहिरीजवळ येताच तिने उडी मारली. ही घटना क्षणार्धात घडल्याने नेमकी ही महिला कोण आणि तिने असे टोकाचे पाऊल का उचलले हे कोणालाही समजले नाही. विहिरीत उडी मारलेली महिला पाण्यात बुडत होती. विहिरीच्या कठड्यावर पाहणाऱ्यांची गर्दी झाली होती. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरीकांपैकी कोणालाही पोहता येत नव्हते. अशातच गर्दी नेमकी का झाली हे पाहण्यासाठी आलेल्या राजू विकास सोनवणे, प्रकाश साळवे, प्रशांत पवार या तिघांनी पटापट विहिरीत उडी मारली. बुडणााऱ्या महिलेला वाचविले. ते करीत असताना गंमत बघणाऱ्या नागरीकांनी दोर आणि खाटीची व्यवस्था केली. खाटेला दोर बांधून ती विहिरीत सोडली. त्यानंतर या पट्टीच्या पोहणाऱ्या नागरीकांनी त्या महिलेला खाटेवर टाकले. खाट विहिरीच्या वरती खेचण्यात आली. बुडून मरण पावणारी महिला सुदैवाने जीवंत असल्याचे पाहून उपस्थित नागरीकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या महिलेला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचार केल्यानंतर तिला धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.