गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच जीवनाला कलाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 21:57 IST2020-07-04T21:57:21+5:302020-07-04T21:57:41+5:30
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित । आई-वडिलांनंतर अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून मिळाला मोलाचा सल्ला

गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच जीवनाला कलाटणी
देवेंद्र पाठक
धुळे : प्रथम माझे आई आणि वडील हे गुरु आहेत़ त्यांनी दिलेल्या खंबीर पाठींब्यामुळे आणि स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून मिळालेले मोलाचे मार्गदर्शन मला खूपच फायद्याचे ठरले असे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सांगितले़
गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पोलीस अधीक्षक पंडित यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़ त्यावेळी त्यांनी गुरुबद्दलचे महत्व अधोरेखित केले़
पंडित यांचे प्राथमिक शिक्षण बीड येथे झाले़ तर भोसला मिलीटरी स्कूल येथे माध्यमिक शिक्षण झाले़ अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले़ अभ्यास करीत असताना आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात वळायचे याबाबत आई-वडिलांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले़ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असे हक्काने त्यांच्याकडून सांगण्यात येत असल्याने मी जीवनाच्या वाटेवर खंबीरपणे उभा होता आणि आजही आहे़
कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझा स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरु होता़ अशातच मला एका नामांकित कंपनीत चांगल्या मोठ्या पदावर नोकरी देखील मिळाली़ ती करीत असताना माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरुच होता़ तिथे माझे मन लागत नव्हते़ नोकरी करायची म्हणून करीत होतो़ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असतानाच अविनाश धर्माधिकारी सरांशी भेट झाली़ त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळू लागले आणि माझ्या जीवनाला तिथून कलाटणी मिळाली़ परीक्षेच्या माध्यमातून माझ्या आवडीच्या क्षेत्रात पदार्पण केले आणि पोलीस खात्यात रुजू झाल्याचा आनंद आहे़
गुरुंचे स्थान जीवनामध्ये अबाधीत आहेच़ काय चांगले आहे, काय वाईट आहे, कोणती बाब चुकीची आहे हे गुरुकडून समजते़ त्याचे आकलन देखील वेळेवर झाले पाहीजे़ त्यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्यानंतर आपण आपली वाटचाल निश्चित करायला हवी़ त्यांच्याकडून आलेला सल्ला हा अंतिम समजून त्यानुसार मार्गक्रमण करणे गरजेचे आहे़ गुरुंनी दिलेल्या सल्ल्यावर विश्वास ठेवायला हवा, असे मत चिन्मय पंडित यांनी व्यक्त केले़
- आई आणि वडिल हेच प्रथम गुरु आहेत, हे कधीही कोणीही विसरु नये़
- जीवनाच्या वाटेवर भेटणारे व कळत नकळत त्यांच्याकडून सल्ला हा मोलाचा ठरत असतो़
- गुरुकडून आलेला सल्ला हा प्रमाणित करुन त्यानुसार मार्गक्रमण करायला हवे़
- गुरुकडून मिळालेले मार्गदर्शन हे जीवनाच्या वाटेवर मोलाचे ठरणारे असते, हे लक्षात ठेवा़
- आपल्या हिताचा निर्णय खंबीरपणे घेत असताना कधीही डगमगू नका़