शाळकरी मुलांनी दिले आनंदी जीवनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:16 IST2020-03-02T12:15:41+5:302020-03-02T12:16:08+5:30
उपक्रम : पोदार इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या ‘परिवर्तन मोहिम’ने वेधले धुळेकरांचे लक्ष

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील शाळकरी मुला-मुलींनी रस्त्यावर कलाप्रकार सादर करत प्रौढांना आनंदी जीवन जगण्याचे धडे दिले़ मुलांचे हे प्रयोग पाहण्यासाठी पादचाऱ्यांची पाऊले देखील आपोआप थांबली़
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी समाज प्रबोधनपर उपक्रमांतर्गत धुळे शहरात नुकतीच परिवर्तन मोहिम राबविली़ दत्त मंदिर चौक, आग्रा रोड, शिवतीर्थ चौक, जयहिंद चौक अशा गर्दीच्या ठिकाणी कार्यक्रम सादर करण्यात आले़ त्यात हास्ययोग, नाटिका, जीवनात आनंद निर्माण करणारे विविध खेळ, नृत्य, बोधकथा, गाणी, इच्छा पूर्ण करणारे झाड, भेटकार्ड, बिल्ले असे अनेक कलाप्रयोग सादर करुन आनंदी जीवन कसे जगावे याची प्रात्यक्षिके सादर केली़ विद्यार्थ्यांच्या या उपक्रमांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले़ सामाजिक बांधिलकी जोपासणाºया शाळकरी मुलांच्या या उपक्रमांना नागरीकांनीही भरभरुन दाद दिली़ विद्यार्थ्यांचे हे कलाप्रकार पाहण्यासाठी चौकाचौकात गर्दी झाली होती़ शाळकरी मुलांच्या या उपक्रमाने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले़ विद्यार्थ्यांना प्राचार्य भूषण उपासनी यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले़