ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांचाच आधार आहे. या शाळांमध्येही चांगल्यापैकी शिक्षण मिळत असते. मात्र अनेक पालकांचा ओढा हा पाल्याला इंग्रजी, अथवा सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न असल्याने, गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. पूर्वी एकेका वर्गात ३०-३५ विद्यार्थी असायचे, ती संख्या आता कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यात १०६ शाळा अशा आहेत की त्यांची संख्या २० पर्यंतच मर्यादित आहे. त्यातही यातील ९३ शाळांमध्ये २० पेक्षाही कमी पटसंख्या आहे.
पहिली ते चौथीपर्यंतचे शैक्षणिक वर्ष नेमके केव्हापासून सुरू होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे शासनाचे विचाराधीन आहे. विद्यार्थी अथवा शिक्षकांचेही समायोजन झाल्यास, त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर अथवा शिकविणाऱ्यावरही कुठलाच परिणाम होणार नाही. दरम्यान जूनपासून शाळा सुरू झाल्या, आणि तत्पूर्वी विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले अन् शाळांची संख्या २० पेक्षा जास्त झाली तर या शाळांवरील संकटही टळू शकते. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्याची शाळांच्या शिक्षकांवर जबाबदारी येऊन ठेपली आहे.
या शाळांचे होणार समायोजन
२०१८ मध्येही राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १० पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानुसार जिल्ह्यातील १० शाळांचे लगतच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले होते. आता ज्या शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे, अशा शाळांचेही लगतच्या शाळांमध्ये समायोजन होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
साक्री तालुक्यातील शाळांची संख्या जास्त
२० पेक्षा कमी पटसंख्या असेलेल्या शाळांमध्ये साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची संख्या सर्वाधिक आहे. या तालुक्यात तब्बल ५८ शाळांमध्ये २० पेक्षाही कमी पटसंख्या असल्याचे शिक्षण विभागाची आकडेवारी आहे. त्याखालोखाल शिरपूर तालुक्यातील १५, धुळे तालुक्यातील १३ शाळांमध्येही कमी पटसंख्या आहे. तर शिंदखेडा तालुक्यात फक्त सहा शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे.
ज्या शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे, अशा शाळा शासनाने बंद केल्यास, त्या ठिकाणी शिकविणाऱ्या शिक्षकांचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांचेही जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये समायोजन करावे लागेल.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच त्यांना शाळेत येण्या-जाण्यासही त्रास होऊ नये हा सारासार विचार करून त्यांनाही गावापासून अगदी जवळ असलेल्या शाळांमध्ये दाखल करून घेतले जाण्याची शक्यता आहे.