मागील २६ दिवसात आढळले तब्बल ४ हजार ६९२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:18+5:302021-03-18T04:36:18+5:30

धुळे - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. १८ फेब्रुवारीनंतर जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली ...

In the last 26 days, 4 thousand 692 patients were found | मागील २६ दिवसात आढळले तब्बल ४ हजार ६९२ रुग्ण

मागील २६ दिवसात आढळले तब्बल ४ हजार ६९२ रुग्ण

धुळे - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. १८ फेब्रुवारीनंतर जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. १९ फेब्रुवारी ते १६ मार्च या मागील २६ दिवसात तब्बल ४ हजार ६९२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान दैनंदिन रुग्णसंख्येने ५०, १००, २००, ३०० आदी टप्पे गाठत १५ मार्च रोजी ५०० चा टप्पादेखील ओलांडला आहे.

मागील वर्षी १० एप्रिल रोजी जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. ऑक्टोबरनंतर मात्र रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली होती, तसेच कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले होते. कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९७ टक्क्यांपर्यंत गेले होते. यावर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस रुग्णांची संख्या खूप कमी झाली होती. चारही तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली होती. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले होते, तसेच कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती, त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे वाटत होते. लवकरच जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होईल, असे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे.

१४ फेब्रुवारी रोजी आढळले होते केवळ ६ रुग्ण -

जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. १४ फेब्रुवारी रोजी केवळ ६ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. १५ फेब्रुवारी रोजी १८, १६ फेब्रुवारी रोजी ७, १७ रोजी १७ तर १८ फेब्रुवारी रोजी २८ रुग्ण आढळले होते. १८ फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्या नियंत्रणात होती. त्यानंतर मात्र रुग्णांच्या संख्येत टप्प्या - टप्प्याने वाढ होत गेली.

१९ फेब्रुवारीपासून रुग्ण वाढायला सुरुवात -

१९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ३८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मागील बऱ्याच दिवसात रुग्णसंख्येने ३० चा टप्पा ओलांडलेला नव्हता. १९ फेब्रुवारी रोजी ३८ अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत राहिली. २० फेब्रुवारी रोजी दैनंदिन रुग्णसंख्येने ५० चा टप्पा ओलांडला होता.

२६ फेब्रुवारी रुग्णसंख्या १०० पार -

२६ फेब्रुवारी रोजी रुग्णसंख्येने १०० चा टप्पा ओलांडला होता. रुग्णवाढीच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्यांदाच दैनंदिन पॉझिटिव्ह अहवालांची संख्या शंभर पार गेली होती. २६ रोजी १९३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

मार्च महिन्यात आतापर्यंत तीनदा ३०० पेक्षा जास्त रुग्ण -

४ मार्च रोजी दैनंदिन रुग्णसंख्येने २०० चा टप्पा ओलांडला होता. ४ मार्च रोजी २०७ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर १० मार्च रोजी ३०० पेक्षा अधिक अहवाल पॉझिटिव्ह आले. १० मार्च रोजी तब्बल ३९८ रुग्ण आढळले होते. मार्च महिन्यात आतापर्यंत तीनदा ३०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

१५ मार्च रोजी आढळले सर्वाधिक ५१५ रुग्ण -

१५ मार्च रोजी तब्बल ५१५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण १५ रोजी आढळले आहेत. जिल्ह्यात मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर एका दिवसात सर्वाधिक २६९ रुग्ण आढळले होते. यंदा पुन्हा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मात्र ५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळले, तसेच १६ मार्च रोजी ४५३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: In the last 26 days, 4 thousand 692 patients were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.