मागील १५ दिवसांमध्ये ३० रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST2021-07-16T04:25:43+5:302021-07-16T04:25:43+5:30
- भूषण चिंचोरे धुळे - जुलै महिन्यात आतापर्यंत केवळ ३० रुग्ण आढळले आहेत, तर ५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली ...

मागील १५ दिवसांमध्ये ३० रुग्ण आढळले
- भूषण चिंचोरे
धुळे - जुलै महिन्यात आतापर्यंत केवळ ३० रुग्ण आढळले आहेत, तर ५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच गत १५ दिवसांत चारदा एकही रुग्ण आढळला नसल्याने दिलासा मिळाला आहे.
१ ते १४ जुलै या कालावधीत आढळलेल्या ३० रुग्णांमध्ये धुळे शहरातील १२, शिंदखेडा तालुक्यातील ४, धुळे ६, साक्री ६ व शिरपूर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. आढळलेल्या बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या जिल्ह्यात केवळ १४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात, धुळे शहरातील सहा, धुळे तालुका तीन, शिंदखेडा एक व साक्री तालुक्यातील चार रुग्णांचा समावेश आहे. शिरपूर तालुक्यात सध्या एकही रुग्ण नाही.
चारदा सर्व अहवाल निगेटिव्ह -
१ ते १४ जुलै या कालावधीत चार दिवस कोरोनाचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ८ जुलै, ११, १२ व १४ जुलैरोजी एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. दैनंदिन बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णही कमी झाले आहेत.
शिरपूर तालुक्यात १४ दिवसांपासून रुग्ण नाही -
शिरपूर तालुक्यात १ जुलैरोजी दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर एकही रुग्ण आढळलेला नाही. १ जुलैरोजी आढळलेले दोन्ही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एकही सक्रिय रुग्ण नसल्याने शिरपूर तालुका कोरोनामुक्त झाला आहे.
शिंदखेड्यात आढळले चार रुग्ण -
गत १४ दिवसांमध्ये शिंदखेडा तालुक्यात चार रुग्ण आढळले आहेत. ५ जुलैरोजी दोन रुग्ण आढळले होते. ६ व १३ जुलैरोजी प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळला आहे. सध्या तालुक्यात केवळ एक सक्रिय रुग्ण आहे.
धुळे तालुक्यात एक आठवड्यापासून रुग्ण नाही -
धुळे तालुक्यात गत १४ दिवसांत सहा रुग्ण आढळले आहेत. तसेच ८ जुलैनंतर एकही रुग्ण आढळलेला नाही. सध्या तालुक्यातील तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र आठवडाभरापासून एकही रुग्ण नसल्याने तालुका कोरोनामुक्त होऊ शकतो.