टाकरखेडा परिसरात मोठा वाळू साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 22:15 IST2020-07-21T22:12:27+5:302020-07-21T22:15:22+5:30
तक्रार : कारवाई करण्याची मागणी

dhule
दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथे तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करुन त्याचा साठा नदी पात्रात करण्यात आला आहे़ अवैध वाळू उपशाविषयी कारवाई करावी, अशी मागणी टाकरखेडा येथील रहिवासी अनिता नरेंद्र गिरासे यांनी केली आहे़
यासंदर्भात गिरासे यांनी दोंडाईचा अपर तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टाकरखेडा परिसरात असलेल्या अवैध वाळू उपसा आणि साठ्याबाबत २ जुलै रोजी देखील तक्रार दिली होती़ सुलवाडे, जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी वाळू देण्याची मुदत तीन महिन्यांपूर्वीच संपली आहे़ तरी देखील साठा कायम आहे़ अशा प्रकारे बेकायदेशिर वाळूसाठा करुन त्यानंतर डंपर अथवा तत्सम वाहनाच्या सहाय्याने सदर साठा चोरुन विकला जात आहे़ असे असताना महसूल प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही, असा आरोप करण्यात आला आहे़ शहादा तहसिलदारांनी गेल्या महिन्यात सारंगखेडा परिसरात मोठी कारवाई करीत अनेक वाहने पकडून दंड ठोठावला होता़ आपणाकडूनही अशी कारवाई अपेक्षीत होती़ परंतु तसे झाले नाही़ टाकरखेडा परिसरात असलेला साठा जप्त करुन त्याचा शासकीय पध्दतीने लिलाव करावा, अशी मागणी केली आहे़ अन्यथा कायदेशिर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा दिला आहे़