जलवाहिनीला मोठी गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 21:13 IST2020-06-25T21:12:38+5:302020-06-25T21:13:24+5:30

लाखो लिटर पाणी वाया : शंभर फुटापर्यंत उडला कारंजा

A large leak to the aqueduct | जलवाहिनीला मोठी गळती

dhule

सोनगीर : धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेच्या जलवाहिनीला सानेगीर ता़ धुळे गावाजवळ मोठ्या प्रमाणावर गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेले़ पाण्याचा दाब जास्त असल्याने महामार्गापर्यंत पाण्याचा फवारा उडत होता़ त्यामुळे महामार्गाची वाहतूक काही तास ठप्प झाली होती़ धुळे महानगरपालिकेचे पथक तब्बल तीन तासानंतर घटनास्थळी दाखल झाले़ पाईपलाईनचे पाणी बंद करुन दुरूस्तीचे काम दिवसभर सुरू होते़
तापी योजनेच्या पाईपलाईनला गुरुवारी सकाळी सात वाजता सोनगीर फाट्यापासून काही अंतरावर एका शुध्द शाकाहारी हॉटेलच्या समोर अचानक गळती लागली. यावेळी पाण्याचे कारंजे थेट महामार्गापर्यंत उडत असल्याने काही काळ सुरक्षितेतचा उपाय म्हणून धुळ्याकडून शिरपूरकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली होती़
जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पिण्याचे शुद्ध पाणी वाहून गेले. यावेळी पाण्याचा प्रेशर खूप असल्याने पाण्याचे कारंजे १०० फूटापेक्षाही अधिक अंतरापर्यंत उडत होते़ सकाळी दहा वाजेनंतर पाण्याचा दाब कमी झाल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली़
पाण्याचा दाब जास्त असल्याने महामार्गालगतची जमीन खचून दरी निर्माण झाली तर हॉटेल नजीकच्या एका शेतात पाणी शिरुन डबके साचले़ यामुळे शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, धुळे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच बाभळे येथील जल शुद्धीकरण केंद्रावरील पंपिंग मशीन बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पंप बंद करून देखील तीन ते चार तास पाण्याचा दाब कायम होता़ दोन ठिकाणी प्रेशर कॉक खोलून दाब कमी झाल्या नंतर दुरुस्तीचे काम हाती घेतले़
सायंकाळी उशिरापर्यंत दुरूस्तीचे काम सुरू होते़ काम झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नरेंद्र बागुल यांनी दिली. दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा कर्मचारी एकनाथ पाटील, के. डी. गोसावी यांचे पथक दाखल झाले असून युद्ध पातळीवर काम सुरू असून लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

Web Title: A large leak to the aqueduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे