धुळे तालुक्यातील मोहाडी येथे आदिवासी वसाहतींमध्ये सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 11:37 IST2019-08-21T11:37:38+5:302019-08-21T11:37:55+5:30
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी यांना दिले निवेदन

धुळे तालुक्यातील मोहाडी येथे आदिवासी वसाहतींमध्ये सुविधांचा अभाव
आॅनलाइन लोकमत
धुळे : तालुक्यातील मौजे मोहाडी प्र.डांगरी येथे आदिवासी वसाहतीमध्ये रस्ते, पाणी, गटारी आदी सुविधांचा अभाव आहे. गावाचे सरपंच, ग्रामसेवक यांचेही दुर्लक्ष झाले आहे. आदिवासींना सुविधा न मिळाल्यास जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा वीर एकलव्य भिल सेनेच्यावतीने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मोहाडी गावात आदिवासींची जवळपास ४ हजार लोकसंख्या आहे. मात्र या वसातहसीतील आदिवासींना शासकीय, आदिवासी विभागाच्या योजना मिळत नाही. वस्तीत रस्ते, गटार, पाणी अशा मुलभूत सुविधांचा अभाव आहे. वस्तीकडे सरपंच, ग्रामसेवकाचे दुर्लक्ष झाले आहे. पावसामुळे अनेकांची घरे गळकी झालेली आहेत. रस्ता नसल्याने चालणेही कठीण झाले आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी सभागृहदेखील नाही. आदिवासींना योजनांचा लाभ का मिळत नाही, याचा अभ्यास करून संबंधिताच्या कार्याचा आढावा घ्यावा अशी मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष जितेंद्र सोनवणे, मंगली भील, अनिल भिल, भास्कर भिल, नामदेव भिल, प्रवीण भिल आदींची नावे आहेत.