कुसुंब्याच्या शेतकऱ्याला पावणे पाच लाखांत गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 21:56 IST2020-12-05T21:56:19+5:302020-12-05T21:56:37+5:30
धुळे तालुका पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा

कुसुंब्याच्या शेतकऱ्याला पावणे पाच लाखांत गंडविले
धुळे : शेतमाल खरेदी करुन केवळ ५५ हजार रुपये अदा केले. उर्वरीत ४ लाख ६२ हजार रुपये दिले नाही. वारंवार तगादा करुनही पैसे दिले नसल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच धुळे तालुका पोलीस ठाण्यात मुंबई येथील एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील शेतकऱ्यांचा दादर मुंबई येथील एका व्यापाऱ्याने विश्वास संपादन केला. त्याचा गैरफायदा घेऊन ५ लाख १७ हजार रुपये किंमतीचा कांदा, कलिंगड, भाजीपाला खरेदी केला. पैसे देताना मात्र ५५ हजार रुपये दिले. उर्वरीत रक्कम लागलीच पाठवितो अशी बतावणी करुन शेतमाल घेऊन गेला. हा प्रकार मार्च २०२० मध्ये कुसुंबा गावात घडला. घेऊन गेलेल्या शेतीमालामध्ये २ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा २१ टन ४५० किलो वजनाचा कांदा, ९० हजार रुपये किंमतीचे १० टन वजनाचे कलींगड, १ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा ११ टन वजनाचा कांदा, ४ टन वजनाचा भाजीपाला असा एकूण ५ लाख १७ हजार रुपये किंमतीचा शेतीमालाचा समावेश होता. पैसे पाठवितो असे सांगून आजपावेतो उर्वरीत ४ लाख ६२ हजार रुपये परत केलेले नाही. याप्रकरणी कुसुंब्यातील दोघा-तिघा शेतकऱ्यांची फसगत झाली आहे.
याप्रकरणी किशोर संतोष शिंदे (४८, रा. कुसुंबा ता. धुळे) या शेतकऱ्याने शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गावडू सोमाना पाटील (रा. चंदगड जि. कोल्हापूर, हल्ली मुक्काम दादर मुंबई) याच्या विरोधात संशयावरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गोटे करीत आहेत.