कुसुंबा-धुळे महामार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:08 IST2020-02-10T12:07:42+5:302020-02-10T12:08:46+5:30
वाहन चालक, प्रवासी हैराण : आठवडाभरात अपघाताची मालिका

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
कुसुंबा : येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर खड्ड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. तसेच या खड्ड्यांमुळे आठवडाभरात अपघातांची मालिका नुकतीच पाहायला मिळाली. त्यात एका महिलेला जीवही गमवावा लागला. त्याचबरोबर किरकोळ जखमीसुद्धा मोठ्या प्रमाणात झाले आहे.
धुळे ते साक्री दरम्यान अनेक पुरुष व महिलांना नोकरी, व्यवसायानिमित्त दररोज ये-जा करावी लागते. मात्र, रस्त्यावर खूप मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनाचा अपघात होण्याची भिती असते. त्यामुळे अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
येत्या काळात या मार्गावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाने महामार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.
कुसुंबा, मोराणे, वार, कुंडाणे, इच्छापुर गणपती आदी ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. नुसते माती टाकून तात्पुरती डागडुजी केल्यास ते खड्डे अजून मोठे होतात. तसेच या माती टाकलेल्या रस्त्यावरून वाहन गेल्यास ते वाहन घसरण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे रस्त्यावरील धूळ प्र्रवाशांच्या नाका, तोंडात, डोळ्यात जाऊन प्रवास त्रासदायक होत आहे. या महामार्गावरील खड्डे त्वरित बुजविले गेले नाही तर प्रवासीवर्गाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रीया या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाºया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
दीड वर्षांपासून हा रस्ता प्रलंबित आहे. दीड वर्षात या महामार्गावर अनेक अपघात झाले. अपघातांची मालिका सुरू आहे. ही अपघातांची मालिका बंद झाली पाहिजे. त्रासदायक प्रवास हा लोकांच्या अंगदुखीचे कारण बनत आहे.
रुग्णाचा जीव टांगणीला
ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांना तातडीने धुळे शहरातील रुग्णालयाकडे घेऊन जावे लागते. मात्र, १०८ रुग्णवाहिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे गंभीर रुग्णाचा प्राण जाण्याची शक्यता असते. याकडे गांभीर्याने लक्ष घालून तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांनी केली आहे.