महाराष्ट्रात खुनशी राजकारण
By Admin | Updated: October 3, 2014 13:17 IST2014-10-03T13:17:53+5:302014-10-03T13:17:53+5:30
महाराष्ट्रातराजकीय पक्षांचा जो काही खेळ चालला आहे तो एकमेकाला संपविण्याचे खुनशी राजकारण सुरू असल्याची टीका भारिप बहुजन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी आज भुसावळ येथे केली.

महाराष्ट्रात खुनशी राजकारण
भुसावळ : महाराष्ट्रातराजकीय पक्षांचा जो काही खेळ चालला आहे तो एकमेकाला संपविण्याचे खुनशी राजकारण सुरू असल्याची टीका भारिप बहुजन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी आज भुसावळ येथे केली.
भारिप बहुजन महासंघाचे भुसावळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विनोद सोनवणे यांच्या निवडणूक प्रचारार्थ शहरातील नृसिंह मंदिराजवळ झालेल्या सभेत ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाच्या ४0 जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करून आता राजकीय पक्षांना ठोकरण्याची वेळ मतदारांवर आली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यापैकी कोणाच्याही अजेंड्यावर आदिवासींच्या विकासाचा मुद्दा नाही. मराठा समाजाला आरक्षणास विरोध नाही. मात्र त्याचवेळी धनगर समाजाने आरक्षण मागितले तर ते का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला.
आयाराम, गयारामच्या खेळामुळे राजकारणाची पात्रता कमी होते. त्या वेळी घसरंडीला सुरुवात होते. आता राजकारणातील नीतीमत्ताच संपली असल्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. या वेळी पक्षाचे उपाध्यक्ष शरद वसतकर, पृथ्वीराज मोरे, समाधान गवई, मोहन सरदार, उमेदवार विनोद सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. खडसेंना सवाल
■ मी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांना विचारतो, त्यांच्या पक्षाच्या आमदारांचा लवासात हिस्सा आहे की नाही. मुंबईत गरिबांच्या घराच्या योजनेबाबत विरोधकांनी आवाज का उठविला नाही, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
■ शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. भरमसाट फी वाढली आहे. कायद्यात बदल करून शिक्षक-पालक संघाला शैक्षणिक फी ठरविण्याचे अधिकार देण्याचा विचार त्यांनी मांडला.