धुळे जिल्ह्यात ८१ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:28+5:302021-07-21T04:24:28+5:30
यावर्षी हवामान विभागाने सरासरीएवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवल्यानंतरही मृगासोबत आर्द्रा नक्षत्रही कोरडेच गेले. मात्र, पाऊस पडेल, या आशेवर ...

धुळे जिल्ह्यात ८१ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण
यावर्षी हवामान विभागाने सरासरीएवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवल्यानंतरही मृगासोबत आर्द्रा नक्षत्रही कोरडेच गेले. मात्र, पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली होती.
धुळे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ लाख १६ हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चत करण्यात आले हाेते. त्यापैकी १९ जुलैपर्यंत ३ लाख ३६ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. एकूण पेरणीची टक्केवारी ८०.७५ टक्के इतकी आहे. जूनच्या सुरुवातीला पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यानंतर पंधरा दिवस विश्रांती घेऊन पुन्हा हजेरी लावली हाेती. पहिला पाऊस वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या हाेत्या. मात्र, नंतर पावसाने दांडी मारली. त्यामुळे नंतरच्या पावसानंतरच शेतकऱ्यांकडून पेरणी करण्यात आली. तसेच काही शेतकऱ्यांकडे बागायतीची साेय असल्याने त्यांनी कमी पावसातही पेरणी करून टाकली. तीन नक्षत्र काेरडी गेली. तर मंगळवारपासून नवीन नक्षत्र सुरू झाले. या नक्षत्राचे वाहन घाेडा असल्याने व राज्यात सर्वदूर पाऊस पडत असल्याने चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
धुळे तालुका आघाडीवर
जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा धुळे तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे तालुक्यात पेरणीचे प्रमाणही जास्त आहे. तालुक्यात १ लाख ७ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ९३ हजार ७३० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. पेरणीची एकूण टक्केवारी ८६.९५ टक्के आहे.
त्याखालोखाल शिंदखेडा तालुक्यात पेरणी झालेली आहे. या तालुक्यात १ लाख ७३२ हेक्टर उद्दिष्टापैकी ८१ हजार ४४१ हेक्टरवर म्हणजेच ८०.८५ टक्के पेरणी झालेली आहे. शिरपूर तालुक्यात १ लाख ६ हजार ५९६ हेक्टरपैकी ८५ हजार ९ हेक्टर म्हणजेच ७९.७५ टक्के पेरणी झाली. दरवर्षी सर्वाधिक पाऊस हाेणाऱ्या साक्री तालुक्यात अद्याप चांगला पाऊस नसल्याने तालुक्यात सर्वांत कमी पेरणी झाली आहे. साक्री तालुक्यात १ लाख १ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चत केले हाेते. त्यापैकी केवळ ७६ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे केवळ ७५.१५ टक्केच पेरणी झाली आहे. अजून पंधरा दिवसात चारही तालुक्यात दमदार पाऊस न झाल्यास पेरणी केलेल्या पिकांना धाेका निर्माण हाेऊ शकताे.