पावसाने ओढ दिल्याने खरिपातील पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST2021-08-29T04:34:34+5:302021-08-29T04:34:34+5:30
माळमाथा परिसर हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात पाहिजे तसा पाऊस होत नाही. पावसामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई, ...

पावसाने ओढ दिल्याने खरिपातील पिके धोक्यात
माळमाथा परिसर हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात पाहिजे तसा पाऊस होत नाही. पावसामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई, पाळीव प्राण्यांना लागणाऱ्या चाऱ्याची टंचाई दरवर्षाप्रमाणे यंदाही भासण्याची शक्यता आहे.
या वर्षी मात्र अल्प प्रमाणात पाऊस झाला. झालेल्या पावसावर बळसाणेसह परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा लागवड व खरिपातील अन्य पिकांची पेरणी केली. दरम्यान, आठवडाभरापासून पावसाने दडी मारली. माळमाथा भागात एक, दोन पाऊस चांगले झाल्याने बळीराजाने कांदा लागवडीपासून ते अन्य पिकांच्या लागवडीकरिता घाईगर्दी केल्याने आजपावेतो विसावलेल्या पावसाची बळीराजाला वाट पाहावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. झालेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. असे असले तरी बळसाणे, दुसाने, इंदवे, हाट्टी, ऐचाळे, सतमाने, कढरे, आगरपाडा, घानेगाव, लोणखेडी, अमोदा, छावडी या गावांसह माळमाथा पट्ट्यात साजेसा पाऊस अद्याप बरसला नाही. जमिनीची तहान पूर्णपणे भागली नसल्याने पावसाचे प्रमाण कमी होताच येथील नदी, नाले क्षीण होऊ लागले. त्यातच गेल्या आठवड्यापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने कांदा पिकासह अन्य खरीप पिकांना एकदमच पाणी कमी झाल्याने कांदा पिकासह खरिपातील पिकांनी तूर्त तरी धोक्याची घंटी वाजवली आहे.
दुसरीकडे भरत असलेल्या उडीद, मूग, तूर, चवळी शेंगा व सोयाबीनला बऱ्यापैकी शेंगा लागल्या आहेत. मात्र पावसाने ओढ दिल्याने या शेंगांचे उत्पन्न निघणार की नाही, याने बळीराजा चिंतातुर झालेला आहे.
परिसरातील धरणे कोरडीठाक
साक्री तालुक्यातील बळसाणेसह माळमाथा भागात पावसाने ओढ दिल्याने नदी, नाले, तलाव, धरणे कोरडीठाक असल्याचे बोलले जाते आहे. परिसरातील धरणांत येणाऱ्या नवीन पाण्याची आवकही थांबली असल्याने धरणसाठा जैसे थे आहे.
उन्हाळ्यासारखे बसतात चटके
गेल्या काही दिवसांपासून आकाशातील ढगांची डरकाळी कमी झाली असून, दिवसभर ऊन पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे गगनाकडे लागले आहेत.