खंडोजी महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:45 IST2021-09-16T04:45:10+5:302021-09-16T04:45:10+5:30
सद्गुरू खंडोजी महाराज यांच्या १९३ व्या पुण्यतिथी निमित्ताने होणाऱ्या नामसप्ताह महोत्सवात अष्टमीच्या रात्री पालखी सोहळ्याचे आयोजन मुख्य बाजारपेठेतून रात्री ...

खंडोजी महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात
सद्गुरू खंडोजी महाराज यांच्या १९३ व्या पुण्यतिथी निमित्ताने होणाऱ्या नामसप्ताह महोत्सवात अष्टमीच्या रात्री पालखी सोहळ्याचे आयोजन मुख्य बाजारपेठेतून रात्री बारा वाजण्याच्या सुमारास केले जाते. पण कोरोना संसर्गामुळे शासनाचे नियम पाळत यावर्षीचा पालखी सोहळा रात्री बारा वाजता विठ्ठल मंदिरात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी सजविण्यात आली व केवळ मंदिराच्या गाभाऱ्यात पालखी प्रदक्षिणा झाली.
मंदिरात मध्यरात्रीपर्यंत भजनाचे आयोजन करण्यात आले होते. मठाधिपती योगेश महाराज देशपांडे यांनी पालखी दर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी आरती करण्यात आली तसेच कुस्ती समितीच्यावतीने कुस्ती समिती सदस्य यांनी विठ्ठल मंदिरात मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. कुस्ती मैदान येथे सद्गुरू खंडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व कुस्ती मैदानाचे पूजन करण्यात आले.
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता यावर्षी कुस्त्यांची दंगल झाली नाही. मंदिरात सायंकाळी छोटेखानी गोपाळ काल्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुस्ती समिती सदस्य पांडुरंग सूर्यवंशी, सतीश पाटील, योगेश नेरकर, प्रताप पाटील, दीपक खरोटे, वसंत चौधरी, चंद्रकांत सूर्यवंशी यासह सदस्य उपस्थित होते.