कापडणे गाव आठ वर्षांपासून पोलीस पाटलाविना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST2021-09-05T04:40:48+5:302021-09-05T04:40:48+5:30

धुळे तालुक्यात कापडणे गाव मोठ्या गावांमध्ये गणले जाते. येथे सुमारे आठ वर्षांपासून पोलीस पाटील पदावर सद्यस्थितीत कोणीही कार्यरत नाही. ...

Kapadne village without police patrol for eight years! | कापडणे गाव आठ वर्षांपासून पोलीस पाटलाविना !

कापडणे गाव आठ वर्षांपासून पोलीस पाटलाविना !

धुळे तालुक्यात कापडणे गाव मोठ्या गावांमध्ये गणले जाते. येथे सुमारे आठ वर्षांपासून पोलीस पाटील पदावर सद्यस्थितीत कोणीही कार्यरत नाही. कोरोना काळात इतर गावांमध्ये पोलीस पाटलांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र कापडणे गावात पोलीस पाटील पदावर कोणीही नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कापडणे गावासाठी पोलीस पाटलाची नेमणूक करावी या मागणीचे निवेदन ग्रा.पं. सदस्य प्रवीण बन्सीलाल पाटील यांनी प्रांताधिकारी तृप्ती घोडमिसे यांना दिले. घोडमिसे यांनी आठ दिवसात हा विषय निकाली काढण्यात येईल, असे तोंडी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, धुळे तालुक्यातील कापडणे हे मोठे नागरी वस्ती असलेले गाव असून पोलीस पाटील पदाबाबत संभ्रमावस्था आहे. यापूर्वी आठ ते दहा वर्षांपासून या गावाचे पोलीस पाटील मूळगावी राहत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ प्रशासकीय सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. हे पद रिक्त आहे की कार्यरत याबाबत कुठेही योग्य माहिती मिळत नाही. कापडणे गावातील बहुसंख्य तरुण पोलीस व आर्मी भरतीच्या तयारीत आहेत. तसेच शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांसाठी पोलीस पाटील यांचा वारस चौकशी दाखला, कुटुंबाचा चौकशी दाखला नियमित लागतो. गावात चोरी, अपघात, खून, भांडण-तंटे व इतर गुन्हेगारीची घटना घडली तर पोलीस पाटलाची महत्त्वाची भूमिका असते; मात्र पद रिक्त असल्याने अडचणी येतात. प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करून पोलीस पाटलाची नेमणूक करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Kapadne village without police patrol for eight years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.