ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान; धन कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:38 IST2021-03-23T04:38:42+5:302021-03-23T04:38:42+5:30
धुळे : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांना दोन महिने झाले आहेत. मात्र या निवडणुकीत नियुक्ती असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अजूनही मानधन मिळालेले ...

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान; धन कधी मिळणार?
धुळे : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांना दोन महिने झाले आहेत. मात्र या निवडणुकीत नियुक्ती असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अजूनही मानधन मिळालेले नाही. निधीअभावी मानधन देता येत नसल्याचे या तालुक्यातील तहसीलदारांनी सांगितले. शिरपूर तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले. निवडणुकीचा निकाल घोषित झाला. त्यानंतर सरपंचपदाची निवडणूकही पार पडली. नवनिर्वाचित सरपंचानी पदाची सूत्रे घेत कामकाजाला सुरुवात केली आहे. मात्र निवडणूक पार पाडण्यासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अजूनही मानधन मिळालेले नाही. साक्री, शिंदखेडा व धुळे तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अजूनही मानधन मिळालेले नाही.
शिरपूरातील कर्मचाऱ्यांना आज मिळणार मानधन -
जिल्ह्यात इतर तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे मानधन थांबले आहे. मात्र शिरपूर तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिरपूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूक पार पडल्या. या निवडणुकीत ३५२ कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. धनादेश बँकेत टाकला असून, त्यांना आज मानधन मिळणार असल्याचे शिरपूर तहसीलदारांनी सांगितले.
निधीची अडचण -
निधीअभावी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले आहे. निवडणुकीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रामविकास विभागाकडून मानधन देण्यात येते. मात्र हा निधी अजूनही प्राप्त झालेला नाही. निधीची अडचण असल्यामुळे मानधन थांबले असून, शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर मानधन अदा केले जाणार असल्याचे साक्रीचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी सांगितले.